त्यांनी त्याला दुरून पाहिले तेव्हा तो त्यांच्याजवळ येऊन पोहचण्यापूर्वी, त्याला मारून टाकण्याचा त्यांनी कट केला. ते एकमेकांना म्हणाले, “पाहा, तो स्वप्नदर्शी येत आहे. तर आता चला, आपण त्याला ठार करून एका खड्ड्यात टाकून देऊ आणि मग सांगू की कोणा हिंस्र पशूने त्याला खाऊन टाकले; मग पाहू त्याच्या स्वप्नांचे काय होते ते!” हे रऊबेनाच्या कानी आले, तेव्हा त्याने त्यांच्या हातांतून त्याला सोडवले; तो त्यांना म्हणाला, “आपण त्याला जिवे मारू नये.” रऊबेन त्यांना म्हणाला, “रक्तपात करू नका; तर ह्या रानातल्या खड्ड्यात त्याला टाका, पण त्याच्यावर हात टाकू नका.” त्यांच्या हातांतून सोडवून त्याला त्याच्या बापाकडे परत पाठवून द्यावे म्हणून तो असे म्हणाला. योसेफ आपल्या भावांजवळ पोहचला, तेव्हा त्याच्या अंगात पायघोळ झगा होता. तो त्यांनी काढून घेतला, आणि त्याला धरून खड्ड्यात टाकून दिले; तो खड्डा कोरडा होता, त्यात पाणी नव्हते. मग ते शिदोरी खायला बसले असता, त्यांनी वर नजर करून पाहिले तेव्हा इश्माएली लोकांचा एक काफला उंटांवर मसाला, ऊद व गंधरस लादून गिलादाहून मिसरास जात आहे असे त्यांना दिसले. तेव्हा यहूदा आपल्या भावांना म्हणाला, “आपण आपल्या भावाला ठार मारून त्याचा खून लपवला तर काय लाभ? चला, आपण त्याला ह्या इश्माएली लोकांना विकून टाकू; आपण त्याच्यावर हात टाकू नये; कारण तो आपला भाऊ आहे, आपल्या हाडामांसाचा आहे.” हे त्याच्या भावांना पसंत पडले. ते मिद्यानी व्यापारी जवळून चालले तेव्हा त्यांनी योसेफाला त्या खड्ड्यातून ओढून बाहेर काढले आणि त्या इश्माएली लोकांना वीस रुपयांना विकून टाकले. ते योसेफाला मिसर देशात घेऊन गेले.
उत्पत्ती 37 वाचा
ऐका उत्पत्ती 37
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 37:18-28
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ