YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 3:9-20

उत्पत्ती 3:9-20 MARVBSI

तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला हाक मारून म्हटले, “तू कोठे आहेस?” तो म्हणाला, “मी बागेत तुझा आवाज ऐकला, तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिऊन लपलो.” देवाने म्हटले, “तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्लेस काय?” आदाम म्हणाला, “जी स्त्री तू मला सोबतीला दिलीस तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले.” परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, “हे तू काय केलेस?” स्त्री म्हणाली, “सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले.” तेव्हा परमेश्वर देव सर्पाला म्हणाला, “तू हे केलेस म्हणून सर्व ग्रामपशू व वनचर ह्यांच्यापेक्षा तू शापग्रस्त हो; तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील; आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती ह्यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडशील.” तो स्त्रीला म्हणाला, “मी तुझे दु:ख व तुझे गर्भधारण बहुगुणित करीन; तू क्लेशाने लेकरे प्रसवशील; तरी तुझा ओढा नवर्‍याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवील.” आदामाला तो म्हणाला, “तू आपल्या स्त्रीचे ऐकलेस आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्लेस; म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे; तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील; ती तुला काटे व कुसळे देईल; तू शेतातले पीक खाशील; तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुन: मातीला जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे; तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील.” आदामाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेवले कारण ती अवघ्या जीवधारी जनांची माता होय.