YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 27:21-29

उत्पत्ती 27:21-29 MARVBSI

मग इसहाक याकोबाला म्हणाला, “माझ्या बाळा, जरा जवळ ये; तू माझा मुलगा एसावच आहेस की काय हे मला चाचपून पाहू दे.” तेव्हा याकोब आपला बाप इसहाक ह्याच्याजवळ गेला; तो त्याला चाचपून म्हणाला, “वाणी तर याकोबाची आहे, पण हात एसावाचे आहेत.” त्याचे हात त्याचा भाऊ एसाव ह्याच्या हातांसारखे केसाळ होते म्हणून त्याने त्याला ओळखले नाही आणि त्याला आशीर्वाद दिला. तो त्याला म्हणाला, “तू माझा मुलगा एसावच आहेस काय?” तो म्हणाला, “होय, मीच तो.” तो म्हणाला, “ते माझ्याकडे आण, मग माझ्या मुलाने म्हणजे तू आणलेले हरणाचे मांस खाऊन मी तुला आशीर्वाद देईन. याकोबाने ते त्याच्याकडे आणले व त्याने ते खाल्ले; मग त्याने त्याला द्राक्षारस आणून दिला तो, तो प्याला. मग त्याचा बाप इसहाक त्याला म्हणाला, “माझ्या मुला, जरा जवळ येऊन माझे चुंबन घे.” त्याने जवळ जाऊन त्याचे चुंबन घेतले; तेव्हा त्याने त्याच्या वस्त्रांचा वास घेऊन आशीर्वाद दिला तो असा : पाहा, परमेश्वराने आशीर्वाद दिलेल्या शेताप्रमाणे माझ्या मुलाचा सुगंध येत आहे; देव तुला आकाशाचे दहिवर पृथ्वीवरील सुपीक जमिनी आणि विपुल धान्य व द्राक्षारस देवो; लोक तुझी सेवा करोत; वंश तुला नमोत; तू आपल्या भाऊबंदांचा स्वामी हो; तुझे सहोदर तुला नमोत; तुला शाप देणारे सगळे शापग्रस्त होवोत; तुला आशीर्वाद देणारे सगळे आशीर्वाद पावोत.