YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 27:1-29

उत्पत्ती 27:1-29 MARVBSI

इसहाक वृद्ध झाला व त्याची दृष्टी मंद होऊन त्याला दिसेनासे झाले, तेव्हा त्याने एके दिवशी आपला वडील मुलगा एसाव ह्याला बोलावून म्हटले, “बाळा”; तो म्हणाला, “काय आज्ञा?” तो त्याला म्हणाला, “पाहा, मी आता म्हातारा झालो आहे, आणि मला मृत्यू केव्हा येईल ते ठाऊक नाही. तर आपली शस्त्रे, आपले धनुष्य व भाता घेऊन रानात जा आणि पारध करून माझ्यासाठी हरणाचे मांस आण, आणि माझ्या आवडीचे रुचकर पक्वान्न तयार करून आण; मी ते खाईन आणि मग मरण्यापूर्वी मी तुला आशीर्वाद देईन.” इसहाक आपला मुलगा एसाव ह्याच्याशी बोलत असता रिबका ऐकत होती. मग एसाव हरणाची पारध करण्यास रानात गेला. इकडे रिबका आपला मुलगा याकोब ह्याला म्हणाली, “हे पाहा, मी तुझ्या बापाला तुझा भाऊ एसाव ह्याच्याशी असे बोलताना ऐकले की, हरणाची पारध करून रुचकर पक्वान्न तयार करून आण, म्हणजे मी ते खाऊन मरण्यापूर्वी परमेश्वरासमक्ष तुला आशीर्वाद देईन. तर माझ्या बाळा, आता मी सांगते ते ऐक, माझ्या सांगण्याप्रमाणे कर. आताच्या आता कळपात जाऊन त्यातली दोन चांगली करडे घेऊन ये; म्हणजे मी त्यांचे तुझ्या बापाच्या आवडीचे पक्वान्न तयार करीन; मग ते तुझ्या बापाकडे घेऊन जा, म्हणजे तो ते खाऊन मरण्यापूर्वी तुला आशीर्वाद देईल.” ह्यावर याकोब आपली आई रिबका हिला म्हणाला, “पाहा, माझा भाऊ एसाव केसाळ माणूस आहे, आणि मी तर केसरहित माणूस आहे. माझा बाप मला कदाचित चाचपून पाहील आणि मी त्याला ठकवीत आहे असे त्याला दिसून येईल, मग आशीर्वादाऐवजी शाप मात्र मी मिळवीन.” त्याची आई त्याला म्हणाली, “माझ्या बाळा, तुला शाप मिळाल्यास तो मला लागो; माझे एवढे म्हणणे ऐक व करडे घेऊन ये.” तेव्हा त्याने जाऊन ती आईकडे आणली, आणि त्याच्या आईने त्याच्या बापाच्या आवडीचे पक्वान्न तयार केले. मग रिबकेने आपला वडील मुलगा एसाव ह्याची घरात असलेली आपल्याजवळची उंची वस्त्रे घेऊन आपला धाकटा मुलगा याकोब ह्याला घातली, तिने त्याच्या हाताला व मानेच्या गुळगुळीत भागांना करडांची कातडी लपेटली, आणि आपण तयार केलेले रुचकर पक्वान्न व भाकर ही आपला मुलगा याकोब ह्याच्या हाती दिली. तो आपल्या बापाकडे जाऊन म्हणाला, “बाबा”; तेव्हा तो म्हणाला, “काय आहे? माझ्या बाळा, तू कोण?” तेव्हा याकोब आपल्या बापाला म्हणाला, “मी एसाव, आपला वडील मुलगा आहे; आपल्या सांगण्याप्रमाणे मी केले आहे; तर उठून बसा आणि मी हरणाचे मांस आणले आहे एवढे खा; आणि आपण मला आशीर्वाद द्यावा.” तेव्हा इसहाक आपल्या मुलाला म्हणाला, “माझ्या बाळा, तुला ते इतक्या लवकर कसे मिळाले?” तो म्हणाला, “आपला देव परमेश्वर ह्याने मला ते लवकर मिळू दिले.” मग इसहाक याकोबाला म्हणाला, “माझ्या बाळा, जरा जवळ ये; तू माझा मुलगा एसावच आहेस की काय हे मला चाचपून पाहू दे.” तेव्हा याकोब आपला बाप इसहाक ह्याच्याजवळ गेला; तो त्याला चाचपून म्हणाला, “वाणी तर याकोबाची आहे, पण हात एसावाचे आहेत.” त्याचे हात त्याचा भाऊ एसाव ह्याच्या हातांसारखे केसाळ होते म्हणून त्याने त्याला ओळखले नाही आणि त्याला आशीर्वाद दिला. तो त्याला म्हणाला, “तू माझा मुलगा एसावच आहेस काय?” तो म्हणाला, “होय, मीच तो.” तो म्हणाला, “ते माझ्याकडे आण, मग माझ्या मुलाने म्हणजे तू आणलेले हरणाचे मांस खाऊन मी तुला आशीर्वाद देईन. याकोबाने ते त्याच्याकडे आणले व त्याने ते खाल्ले; मग त्याने त्याला द्राक्षारस आणून दिला तो, तो प्याला. मग त्याचा बाप इसहाक त्याला म्हणाला, “माझ्या मुला, जरा जवळ येऊन माझे चुंबन घे.” त्याने जवळ जाऊन त्याचे चुंबन घेतले; तेव्हा त्याने त्याच्या वस्त्रांचा वास घेऊन आशीर्वाद दिला तो असा : पाहा, परमेश्वराने आशीर्वाद दिलेल्या शेताप्रमाणे माझ्या मुलाचा सुगंध येत आहे; देव तुला आकाशाचे दहिवर पृथ्वीवरील सुपीक जमिनी आणि विपुल धान्य व द्राक्षारस देवो; लोक तुझी सेवा करोत; वंश तुला नमोत; तू आपल्या भाऊबंदांचा स्वामी हो; तुझे सहोदर तुला नमोत; तुला शाप देणारे सगळे शापग्रस्त होवोत; तुला आशीर्वाद देणारे सगळे आशीर्वाद पावोत.