तेव्हा इसहाक तेथून निघाला आणि गरार खोर्यात डेरा देऊन तेथे राहिला. आणि त्याचा बाप अब्राहाम ह्याच्या हयातीत ज्या विहिरी खणल्या होत्या व ज्या त्याच्या मृत्यूनंतर पलिष्ट्यांनी बुजवून टाकल्या होत्या, त्या त्याने पुन्हा उकरल्या, आणि त्याच्या बापाने जी नावे दिली होती तीच त्याने त्यांना पुन्हा दिली. इसहाकाचे चाकर त्या खोर्यात खणत असता तेथे त्यांना जिवंत पाण्याचा झरा लागला. तेव्हा गरार येथील गुराखी इसहाकाच्या गुराख्यांशी भांडले व म्हणाले की, “हे पाणी आमचे आहे.” त्यावरून त्याने त्या विहिरीचे नाव एसेक (कलह) असे ठेवले; कारण त्यांनी त्याच्याशी कलह केला. मग त्यांनी दुसरी विहीर खणली, तिच्यावरूनही ते भांडले. म्हणून त्याने तिचे नाव सितना (वैर) असे ठेवले. तो तेथून पुढे गेला आणि तेथे त्याने आणखी एक विहीर खणली; तेव्हा तिच्यावरून ते भांडले नाहीत, म्हणून त्याने तिचे नाव रहोबोथ (विस्तार) असे ठेवले, आणि तो म्हणाला, “परमेश्वराने आमच्या भूमीचा विस्तार केला आहे आता ह्या देशात आमची वाढ होईल.” तेथून पुढे तो वरती बैर-शेबा येथे गेला. त्याच रात्री परमेश्वराने त्याला दर्शन देऊन म्हटले, “तुझा बाप अब्राहाम ह्याचा मी देव आहे; भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे; मी आपला सेवक अब्राहाम ह्याच्यासाठी तुला आशीर्वादित करीन व तुझी संतती बहुगुणित करीन.” मग त्याने तेथे एक वेदी बांधून परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली; व तेथे आपला डेरा दिला, तेथे इसहाकाच्या चाकरांनी एक विहीर खणली. त्यानंतर अबीमलेख आपला मित्र अहुज्जाथ व आपला सेनापती पीकोल ह्यांना बरोबर घेऊन गराराहून त्याच्याकडे गेला. तेव्हा इसहाक त्याला म्हणाला, “तुम्ही तर माझा द्वेष करता आणि मला तुम्ही आपल्यामधून घालवून दिले; असे असता माझ्याकडे आता का आलात?” त्यांनी म्हटले, “परमेश्वर तुमच्याबरोबर आहे हे आम्हांला स्पष्ट दिसून आले आहे; म्हणून आम्ही विचार केला की, आपल्यामध्ये म्हणजे आमच्या-तुमच्यामध्ये आणभाक व्हावी आणि आम्ही तुमच्याशी करार करावा. आम्ही तुम्हांला काही उपद्रव केला नाही; आम्ही केवळ तुमचे बरे केले व तुम्हांला शांतीने रवाना केले, तसे तुम्ही आमचे काही वाईट करू नये; आता तुमच्यावर परमेश्वराचा आशीर्वाद आहे.” तेव्हा त्याने त्यांना मेजवानी दिली आणि त्यांचे खाणेपिणे झाले. त्यांनी पहाटेस उठून एकमेकांशी शपथ वाहिली; मग इसहाकाने त्यांना निरोप दिला; आणि ते त्याच्यापासून शांतीने गेले. त्याच दिवशी असे झाले की इसहाकाचे चाकर जी विहीर खणत होते तिच्याविषयी त्यांनी वर्तमान आणले की विहिरीस पाणी लागले आहे. त्याने तिचे नाव शेबा (शपथ) असे ठेवले, तिच्यावरून त्या नगराचे नाव बैर-शेबा (शपथेची विहीर) असे पडले. ते आजपर्यंत चालू आहे. एसाव चाळीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने बैरी हित्ती ह्याची मुलगी यहूदीथ आणि एलोन हित्ती ह्याची मुलगी बासमथ ह्या बायका केल्या; त्या इसहाक व रिबका ह्यांच्या मनास दु:खदायक झाल्या.
उत्पत्ती 26 वाचा
ऐका उत्पत्ती 26
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 26:17-35
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ