YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 26:1-11

उत्पत्ती 26:1-11 MARVBSI

पूर्वी अब्राहामाच्या दिवसांत दुष्काळ पडला होता तसा दुसरा दुष्काळ आता देशात पडला, तेव्हा इसहाक हा पलिष्ट्यांचा राजा अबीमलेख ह्याच्याकडे गरार येथे गेला. तेव्हा परमेश्वराने त्याला दर्शन देऊन म्हटले, “खाली मिसरात जाऊ नकोस; मी सांगेन त्या देशात राहा. त्या देशात उपरा असा राहा; मी तुझ्याबरोबर असेन, आणि तुला आशीर्वादित करीन; कारण हे सर्व देश मी तुला व तुझ्या संततीला देईन आणि मी तुझा बाप अब्राहाम ह्याच्याशी वाहिलेली शपथ खरी करीन. मी आकाशातील तार्‍यांइतकी तुझी संतती वाढवीन, हे सर्व देश तुझ्या संततीला देईन, आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील; कारण अब्राहामाने माझा शब्द मानला, माझे सांगणे ऐकले, माझ्या आज्ञा, माझे नियम व माझे कायदे पाळले.” तेव्हा इसहाक गरारात वस्ती करून राहिला. तेथल्या लोकांनी त्याच्या बायकोसंबंधाने त्याच्याकडे चौकशी केली; तेव्हा तो म्हणाला, “ही माझी बहीण;” कारण “ही माझी बायको आहे” असे म्हणण्याची त्याला भीती वाटली; तो मनात म्हणाला, “रिबका देखणी आहे. तेव्हा येथले लोक तिच्यासाठी मला जिवे मारतील.” तो तेथे बराच काळ राहिल्यावर एके दिवशी पलिष्ट्यांचा राजा अबीमलेख ह्याने खिडकीतून पाहिले तर इसहाक आपली बायको रिबका हिच्याशी प्रणयलीला करताना त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा अबीमलेखाने त्याला बोलावून म्हटले, “खचीत ही तुझी बायको आहे, तर ही माझी बहीण आहे असे तू कसे सांगितलेस?” इसहाक त्याला म्हणाला, “मी विचार केला की, तिच्यामुळे माझ्या जिवाला अपाय होईल.” अबीमलेख म्हणाला, “तू आमच्याशी असे का केलेस? बरे झाले, नाहीतर ह्या लोकांपैकी कोणी तुझ्या बायकोपाशी सहज गेला असता आणि तू आम्हांला दोष लावला असतास.” मग अबीमलेखाने लोकांना ताकीद दिली की, “जो कोणी ह्या मनुष्याला किंवा ह्याच्या बायकोला हात लावील त्याला खरोखर देहान्त शासन होईल.”