YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 24:52-67

उत्पत्ती 24:52-67 MARVBSI

अब्राहामाच्या सेवकाने त्यांचे हे शब्द ऐकले तेव्हा त्याने भूमीपर्यंत लवून परमेश्वरास नमन केले. मग त्या सेवकाने सोन्यारुप्याचे दागिने व वस्त्रे काढून रिबकेला दिली आणि तिचा भाऊ व तिची आई ह्यांना बहुमोल वस्तू दिल्या. मग त्याने व त्याच्याबरोबरच्या मनुष्यांनी खाणेपिणे करून ती रात्र तेथे घालवली; सकाळी उठल्यावर तो म्हणाला, “माझ्या धन्याकडे जायला मला निरोप द्या. हे ऐकून तिची आई व भाऊ म्हणाले, “मुलीला आमच्याजवळ थोडे दिवस, निदान दहा दिवस तरी राहू द्या; मग ती येईल,” पण तो त्यांना म्हणाला, “परमेश्वराने माझा प्रवास सफळ केला आहे, तर मला ठेवून घेऊ नका; मला निरोप द्या, मला आपल्या धन्याकडे जाऊ द्या.” तेव्हा ते म्हणाले, “आम्ही मुलीला बोलावून ती काय म्हणते ते विचारू.” त्यांनी रिबकेस बोलावून विचारले, “तू ह्या मनुष्याबरोबर जातेस काय?” ती म्हणाली, “जाते.” मग त्यांनी त्यांची बहीण रिबका, तिची दाई, अब्राहामाचा सेवक व त्याची माणसे ह्यांची रवानगी केली. त्यांनी रिबकेला आशीर्वाद देऊन म्हटले, “बाई ग, तू सहस्रावधींची, लक्षावधींची जननी हो व तुझी संतती आपल्या वैर्‍यांच्या नगरांची सत्ता पावो.” मग रिबका व तिच्या सख्या उठल्या आणि उंटांवर बसून त्या मनुष्याच्या मागे गेल्या; ह्याप्रमाणे तो रिबकेस घेऊन गेला. इकडे इसहाक लहाय-रोई विहिरीकडून आला होता; तो नेगेबात राहत असे. इसहाक संध्याकाळच्या वेळी ध्यान करायला रानात गेला असता त्याने नजर वर करून पाहिले तर त्याला उंट येताना दिसले. रिबकेने दृष्टी वर करून इसहाकाला पाहिले तेव्हा ती उंटावरून उतरली. तिने त्या सेवकाला विचारले, “हा रानात आपल्याला सामोरा येत आहे तो कोण?” सेवक म्हणाला, “हा माझा धनी.” तेव्हा तिने बुरखा घेऊन आपले अंग झाकले. मग आपण काय काय केले ते सर्व त्या सेवकाने इसहाकाला सांगितले. मग इसहाकाने तिला आपली आई सारा हिच्या डेर्‍यात आणले, त्याने रिबकेचा स्वीकार केला. ती त्याची पत्नी झाली. आणि तिच्यावर त्याचे प्रेम होते; आपल्या आईच्या पश्‍चात इसहाक सांत्वन पावला.