उत्पत्ती 24:1-27
उत्पत्ती 24:1-27 MARVBSI
अब्राहाम आता वृद्ध होऊन अगदी वयातीत झाला; परमेश्वराने अब्राहामाला सर्व बाबतींत आशीर्वादित केले होते. अब्राहामाच्या सर्वस्वाचा कारभार पाहणारा एक सर्वांत जुना सेवक होता, त्याला त्याने म्हटले, “तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव. मी तुला परमेश्वराची, आकाश व पृथ्वी ह्यांच्या देवाची शपथ घेण्यास सांगतो की ज्या कनानी लोकांत मी राहत आहे त्यांच्या मुलींपैकी कोणतीही नवरी माझ्या मुलासाठी तू पाहणार नाहीस. तर माझ्या देशाला माझ्या आप्तांकडे जाऊन तेथून माझा मुलगा इसहाक ह्याच्यासाठी नवरी पाहून आणशील.” त्याचा सेवक त्याला म्हणाला, “यदाकदाचित नवरी माझ्याबरोबर ह्या देशात येण्यास कबूल झाली नाही तर ज्या देशातून तुम्ही आला त्यात तुमच्या मुलास मी परत घेऊन जावे काय?” तेव्हा अब्राहाम त्याला म्हणाला, “खबरदार! माझ्या मुलाला तिकडे न्यायचे नाही. स्वर्गीच्या ज्या परमेश्वर देवाने मला माझ्या बापाच्या घरातून, माझ्या जन्मभूमीतून आणले आणि मला शपथपूर्वक सांगितले की हा देश मी तुझ्या संततीला देईन. तो तुझ्यापुढे आपला दूत पाठवील आणि तू तेथूनच माझ्या मुलासाठी नवरी आण. पण ती नवरी तुझ्याबरोबर येण्यास कबूल झाली नाही तर तू ह्या माझ्या शपथेतून मोकळा होशील; मात्र माझ्या मुलाला तिकडे परत नेऊ नकोस.” तेव्हा त्या सेवकाने आपला धनी अब्राहाम ह्याच्या मांडीखाली हात ठेवून त्या बाबतीत शपथ वाहिली. मग तो सेवक आपल्या धन्याच्या उंटांपैकी दहा उंट घेऊन निघाला; त्याच्याजवळ त्याच्या धन्याच्या सर्व प्रकारच्या मौल्यवान वस्तू होत्या; तो अराम-नहराईम ह्यातील नाहोराच्या नगरात गेला. संध्याकाळी स्त्रिया पाणी भरायला बाहेर पडतात त्या सुमारास त्याने नगराबाहेरील विहिरीजवळ आपले उंट बसवले, आणि तो म्हणाला, “हे परमेश्वरा, माझा धनी अब्राहाम ह्याच्या देवा, तू आज कृपा करून माझी कार्यसिद्धी कर; माझा धनी अब्राहाम ह्याच्यावर दया कर. पाहा, मी ह्या पाण्याच्या विहिरीजवळ उभा आहे, आणि गावातल्या कन्या पाणी भरायला बाहेर येत आहेत. तर असे घडून येऊ दे की ज्या मुलीला मी म्हणेन, मला पाणी पाजण्यासाठी आपली घागर उतर, आणि ती मला म्हणेल, तू पी आणि तुझ्या उंटांनाही मी पाजते, तीच तुझा सेवक इसहाक ह्याच्यासाठी तू नेमलेली असो; ह्यावरून मला कळेल की तू माझ्या धन्यावर दया केली आहेस.” त्याचे बोलणे संपले नाही तोच अब्राहामाचा बंधू नाहोर ह्याची बायको मिल्का हिचा पुत्र बथुवेल ह्याला झालेली रिबका खांद्यावर घागर घेऊन पुढे आली. ती मुलगी दिसायला फार सुंदर होती; ती कुमारी होती; तिने पुरुष पाहिला नव्हता. ती विहिरीत उतरली व घागर भरून वर आली. तेव्हा तो सेवक धावत जाऊन तिला गाठून म्हणाला, “तुझ्या घागरीतले थोडे पाणी मला पाज.” ती म्हणाली, “प्या, बाबा;” आणि तिने ताबडतोब आपल्या हातावर घागर उतरवून घेऊन त्याला पाणी पाजले. त्याला पुरेसे पाणी पाजल्यावर ती म्हणाली, “मी तुमच्या उंटांसाठी पाणी आणून त्यांना पोटभर पाजते.” मग तिने त्वरा करून घागर डोणीत रिचवली व पुन: पाणी आणायला ती विहिरीकडे धावत गेली; असे तिने त्याच्या सर्व उंटांसाठी पाणी काढले. तेव्हा तो मनुष्य अचंबा करून तिच्याकडे पाहत राहिला; परमेश्वराने आपला प्रवास सफळ केला किंवा कसे ह्याचा विचार करत तो स्तब्ध राहिला. उंटांचे पाणी पिणे झाल्यावर त्या मनुष्याने अर्धा शेकेल भार सोन्याची एक नथ व तिच्या हातांत घालण्यासाठी दहा शेकेल भार सोन्याच्या दोन बांगड्या काढल्या, आणि तो म्हणाला, “तू कोणाची मुलगी आहेस हे मला सांग; तुझ्या बापाच्या घरी आम्हांला उतरायला जागा आहे काय?” ती त्याला म्हणाली, “नाहोरापासून मिल्केला झालेल्या बथुवेलाची मी कन्या.” ती आणखी त्याला म्हणाली, “आमच्या येथे पेंढा व वैरण हवी तितकी आहे, आणि उतरायला जागाही आहे.” तेव्हा त्या मनुष्याने नमून परमेश्वराचे स्तवन केले. तो म्हणाला, “माझा धनी अब्राहाम ह्याचा देव परमेश्वर धन्यावादित आहे; त्याने माझ्या धन्यावर दया करण्याचे व त्याच्याशी सत्यतेने वर्तण्याचे सोडले नाही; परमेश्वराने मला नीट वाट दाखवून माझ्या धन्याच्या भाऊबंदांच्या घरी पोचवले आहे.”

