YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 22:6-14

उत्पत्ती 22:6-14 MARVBSI

तेव्हा अब्राहामाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन आपला पुत्र इसहाक ह्याच्या पाठीवर ठेवली आणि आपल्या हाती विस्तव व सुरा घेतला, आणि ते दोघे बरोबर चालले. तेव्हा इसहाकाने आपला बाप अब्राहाम ह्याला म्हटले, “बाबा!” तो म्हणाला, “काय म्हणतोस बाळा?” त्याने म्हटले, “पाहा, विस्तव व लाकडे आहेत, पण होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे?” अब्राहाम म्हणाला, “बाळा, देव स्वत: होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल.” आणि ते दोघे बरोबर चालले. देवाने त्याला सांगितलेल्या ठिकाणी ते आले तेव्हा अब्राहामाने तेथे वेदी उभारली, तिच्यावर लाकडे रचली आणि आपला पुत्र इसहाक ह्याला बांधून वेदीवरच्या लाकडांवर ठेवले. मग अब्राहामाने आपला मुलगा वधण्यासाठी हात पुढे करून सुरा घेतला. तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्याला आकाशातून हाक मारून म्हटले, “अब्राहामा! अब्राहामा!” तो म्हणाला, “काय आज्ञा?” मग तो बोलला, “तू मुलावर आपला हात चालवू नकोस, त्याला काही करू नकोस; कारण तू आपल्या मुलाला, आपल्या एकुलत्या एका मुलालाही माझ्यापासून राखून ठेवले नाहीस, ह्यावरून तू देवाला भिऊन चालणारा आहेस हे मला कळले.” तेव्हा अब्राहामाने दृष्टी वर करून पाहिले तेव्हा आपल्यामागे झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका त्याला दिसला. मग अब्राहामाने तो एडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला. म्हणून अब्राहामाने त्या ठिकाणाचे नाव याव्हे-यिरे (परमेश्वर पाहून देईल) असे ठेवले; त्यावरून परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल असे आजवर बोलतात.