YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 22:1-18

उत्पत्ती 22:1-18 MARVBSI

ह्या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्राहामाला कसोटीस लावले; त्याने ‘अब्राहामा’, अशी हाक मारली, तेव्हा अब्राहाम म्हणाला, “काय आज्ञा?” देव म्हणाला, “तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक ह्याला घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर.” तेव्हा अब्राहामाने मोठ्या पहाटेस उठून आपल्या गाढवावर खोगीर घातले, आपल्याबरोबर दोघे सेवक व आपला मुलगा इसहाक ह्यांना घेतले, आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला. तिसर्‍या दिवशी अब्राहामाने दृष्टी वर करून ती जागा दुरून पाहिली. अब्राहाम आपल्या सेवकांना म्हणाला, “इथे गाढवाजवळ थांबा, मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो.” तेव्हा अब्राहामाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन आपला पुत्र इसहाक ह्याच्या पाठीवर ठेवली आणि आपल्या हाती विस्तव व सुरा घेतला, आणि ते दोघे बरोबर चालले. तेव्हा इसहाकाने आपला बाप अब्राहाम ह्याला म्हटले, “बाबा!” तो म्हणाला, “काय म्हणतोस बाळा?” त्याने म्हटले, “पाहा, विस्तव व लाकडे आहेत, पण होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे?” अब्राहाम म्हणाला, “बाळा, देव स्वत: होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल.” आणि ते दोघे बरोबर चालले. देवाने त्याला सांगितलेल्या ठिकाणी ते आले तेव्हा अब्राहामाने तेथे वेदी उभारली, तिच्यावर लाकडे रचली आणि आपला पुत्र इसहाक ह्याला बांधून वेदीवरच्या लाकडांवर ठेवले. मग अब्राहामाने आपला मुलगा वधण्यासाठी हात पुढे करून सुरा घेतला. तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्याला आकाशातून हाक मारून म्हटले, “अब्राहामा! अब्राहामा!” तो म्हणाला, “काय आज्ञा?” मग तो बोलला, “तू मुलावर आपला हात चालवू नकोस, त्याला काही करू नकोस; कारण तू आपल्या मुलाला, आपल्या एकुलत्या एका मुलालाही माझ्यापासून राखून ठेवले नाहीस, ह्यावरून तू देवाला भिऊन चालणारा आहेस हे मला कळले.” तेव्हा अब्राहामाने दृष्टी वर करून पाहिले तेव्हा आपल्यामागे झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका त्याला दिसला. मग अब्राहामाने तो एडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला. म्हणून अब्राहामाने त्या ठिकाणाचे नाव याव्हे-यिरे (परमेश्वर पाहून देईल) असे ठेवले; त्यावरून परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल असे आजवर बोलतात. परमेश्वराच्या दूताने आकाशातून अब्राहामाला दुसर्‍यांदा हाक मारून म्हटले, “परमेश्वर म्हणतो, मी स्वत:ची शपथ घेऊन सांगतो की तू हे कृत्य केलेस; आपल्या मुलाला, आपल्या एकुलत्या एका मुलाला माझ्यापासून राखून ठेवले नाहीस; ह्यास्तव मी तुला आशीर्वादित करीन व वृद्धीच वृद्धी करून तुझी संतती आकाशातील तार्‍यांइतकी, समुद्रतीरीच्या वाळूइतकी होईल असे करीन. तुझी संतती आपल्या शत्रूंची नगरे हस्तगत करील. तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीवार्र्दित होतील.”