YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 21:1-21

उत्पत्ती 21:1-21 MARVBSI

ह्यानंतर परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेवर अनुग्रह केला आणि तिला दिलेले वचन पुरे केले. सारा गर्भवती झाली आणि देवाने सांगितलेल्या समयी अब्राहामाला म्हातारपणी तिच्यापासून मुलगा झाला. अब्राहामाला सारेपासून मुलगा झाला त्याचे नाव त्याने इसहाक ठेवले. अब्राहामाने आपला मुलगा इसहाक आठ दिवसांचा झाला तेव्हा देवाच्या आज्ञेप्रमाणे त्याची सुंता केली. इसहाक झाला तेव्हा अब्राहाम शंभर वर्षांचा होता. सारा म्हणाली, “देवाने मला हसवले आहे; जो कोणी हे ऐकेल तो माझ्याबरोबर हसेल.” ती आणखी म्हणाली, “सारा मुलास पाजील असे अब्राहामाला कोण म्हणाला असता? पण त्याच्या म्हातारपणी माझ्यापासून त्याला मुलगा झाला आहे!” तो बाळ मोठा झाला तेव्हा त्याचे दूध तोडले; इसहाकाचे दूध तोडले त्या दिवशी अब्राहामाने मोठी मेजवानी दिली. हागार मिसरिणीस अब्राहामापासून झालेल्या मुलाला खिदळताना सारेने पाहिले. तेव्हा ती अब्राहामाला म्हणाली, “ह्या दासीला व हिच्या मुलाला घालवून द्या; माझा मुलगा इसहाक ह्याच्याबरोबर ह्या दासीचा मुलगा वारस नसावा.” अब्राहामाला आपल्या मुलासंबंधी ही गोष्ट फार वाईट वाटली. तेव्हा देव अब्राहामाला म्हणाला, “हा मुलगा व तुझी दासी ह्यांच्यासंबंधी तू वाईट वाटून घेऊ नकोस; सारा तुला जे काही सांगते ते सगळे ऐक; कारण तुझ्या वंशाचे नाव इसहाकच चालवणार. ह्या दासीच्या मुलापासूनही मी एक राष्ट्र निर्माण करीन; कारण तो तुझे बीज आहे.” नंतर अब्राहामाने मोठ्या पहाटेस उठून भाकरी व पाण्याची मसक आणून हागारेच्या खांद्यावर ठेवली आणि तिचा मुलगा तिच्या हवाली करून तिला रवाना केले; ती निघून बैर-शेबाच्या रानात भटकत राहिली. मसकेतील पाणी संपल्यावर तिने त्या मुलाला एका झुडपाखाली टाकले, आणि ती बाणाच्या टप्प्याइतकी दूर जाऊन त्याच्यासमोर बसली; ती म्हणाली, “आपण आपल्या मुलाचा मृत्यू पाहू नये;” आणि ती त्याच्यासमोर बसून हंबरडा फोडून रडू लागली. देवाने मुलाची वाणी ऐकली व देवाच्या दूताने आकाशातून हाक मारून हागारेला म्हटले, “हागारे, तू कष्टी का? भिऊ नकोस, कारण मुलगा आहे तेथून देवाने त्याची वाणी ऐकली आहे. ऊठ, मुलाला उचलून आपल्या हाती घट्ट धर; त्याच्यापासून मी एक मोठे राष्ट्र निर्माण करीन.” मग देवाने तिचे डोळे उघडले. पाण्याचा झरा तिच्या दृष्टीस पडला; तेव्हा तिने जाऊन मसकेत पाणी भरले व मुलाला पाजले. देव त्या मुलाचा पाठीराखा झाला व तो रानात लहानाचा मोठा होऊन तिरंदाज झाला. तो पारानाच्या रानात वस्ती करून राहिला, आणि त्याच्या आईने त्याला मिसर देशातली बायको करून दिली.