YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 2:4-17

उत्पत्ती 2:4-17 MARVBSI

आकाश व पृथ्वी ह्यांची परमेश्वर1 देवाने उत्पत्ती केली, तेव्हाचा उत्पत्तिक्रम हा होय. परमेश्वर देवाने आकाश व पृथ्वी ही केली तेव्हा शेतातले कोणतेही उद्भिज्ज पृथ्वीवर नव्हते आणि शेतातली कोणतीही वनस्पती अद्याप उगवली नव्हती, कारण परमेश्वर देवाने अजून पृथ्वीवर पाऊस पाडला नव्हता, आणि जमिनीची मशागत करायला कोणी मनुष्य नव्हता; मात्र पृथ्वीवरून धुके वर जात असे व त्याने जमिनीच्या सर्व पृष्ठभागावर सिंचन होत असे. मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यांत जीवनाचा श्वास फुंकला; तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. परमेश्वर देवाने पूर्वेला एदेनात बाग लावली आणि तिच्यात आपण घडवलेल्या मनुष्याला ठेवले. परमेश्वर देवाने दिसण्यात सुंदर व अन्नासाठी उपयोगी अशी सर्व जातींची झाडे, बागेच्या मध्यभागी जीवनाचे झाड, आणि बर्‍यावाइटाचे ज्ञान करून देणारे झाड ही जमिनीतून उगववली. बागेला पाणी देण्यासाठी एदेनात एक नदी उगम पावली; तेथून ती निघून तिचे फाटे फुटून चार नद्या झाल्या. पहिलीचे नाव पीशोन; ही सगळ्या हवीला देशाला वेढते; तेथे सोने सापडते; ह्या देशाचे सोने उत्तम असून येथे मोती व गोमेद सापडतात. दुसर्‍या नदीचे नाव गीहोन; ही सगळ्या कूश देशाला वेढते. तिसर्‍या नदीचे नाव हिद्दकेल; ही अश्शूरच्या पूर्वेला वाहते. चौथ्या नदीचे नाव फरात. परमेश्वर देवाने मनुष्याला एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करायला ठेवले. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की, “बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा; पण बर्‍यावाइटाचे ज्ञान करून देणार्‍या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.”