YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 2:18-23

उत्पत्ती 2:18-23 MARVBSI

मग परमेश्वर देव बोलला, “मनुष्य एकटा असावा हे बरे नाही; तर त्याच्यासाठी अनुरूप साहाय्यक मी करीन.” परमेश्वर देवाने सर्व वनपशू आणि आकाशातील सर्व पक्षी हे मातीचे घडवल्यावर आदाम त्यांना कोणती नावे देतो हे पाहावे म्हणून त्याच्याकडे ते त्याने नेले; तेव्हा आदामाने प्रत्येक सजीव प्राण्याला जे नाव दिले तेच त्याचे नाव पडले. आदामाने सर्व ग्रामपशू, आकाशातील पक्षी व सर्व वनपशू, ह्यांना नावे दिली; पण आदामाला कोणी अनुरूप साहाय्यक मिळेना. मग परमेश्वर देवाने आदामाला गाढ निद्रा आणली, आणि तो झोपला तेव्हा त्याने त्याची एक फासळी काढून घेतली, तिची जागा मांसाने भरून आली; परमेश्वर देवाने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले. तेव्हा आदाम म्हणाला, “आता ही मात्र माझ्या हाडांतले हाड व मांसातले मांस आहे; हिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनवली आहे.”