मग संध्याकाळी ते दोघे दूत सदोम येथे आले, तेव्हा लोट सदोमाच्या वेशीत बसला होता; त्यांना पाहून लोट उठून सामोरा गेला; आणि भूमीपर्यंत तोंड लववून त्याने त्यांना नमन केले;
तो त्यांना म्हणाला, “पाहा, महाराज, आपल्या दासाच्या घरी येण्याची कृपा करा; आजची रात्र राहा, पाय धुवा व सकाळी उठून मार्गस्थ व्हा;” पण ते म्हणाले, “नाही, आम्ही रात्रभर रस्त्यातच मुक्काम करू;”
पण त्याने त्यांना फारच आग्रह केल्यावरून ते त्याच्याबरोबर त्याच्या घरी गेले; त्याने त्यांच्यासाठी भोजन तयार केले; त्याने बेखमीर भाकरी केल्या आणि ते जेवले.
ते निजण्यापूर्वीच त्या नगराच्या माणसांनी, म्हणजे सदोमाच्या माणसांनी, तरुणापासून ते म्हातार्यापर्यंत, अशा सगळ्या लोकांनी चोहोकडून येऊन त्या घराला गराडा घातला.
ते लोटाला हाक मारून म्हणाले, “आज रात्री तुझ्याकडे आलेले पुरुष कोठे आहेत? त्यांना बाहेर आण, म्हणजे आम्ही त्यांच्याशी समागम करू.”
तेव्हा लोट दाराशी त्यांच्याकडे गेला व त्याने आपल्यामागून दार लावून घेतले.
तो म्हणाला, “बांधवहो, असले दुष्कर्म करू नका.
हे पाहा, माझ्या दोन मुली आहेत, त्यांनी अद्यापि पुरुष पाहिलेला नाही; मी त्यांना तुमच्याकडे आणू काय? तुमच्या मर्जीस येईल तसे त्यांच्याशी वर्तन करा; पण ह्या पुरुषांना काही करू नका, कारण ते आसर्यासाठी माझ्या छपराखाली आले आहेत.
तेव्हा ते म्हणाले, “बाजूला हो, हा तर येथे थोडे दिवस राहायला आला आणि आता मोठा न्यायाधीश बनला आहे! तर त्यांच्यापेक्षा तुझीच अधिक खबर घेतो.” असे म्हणून ते लोटाला जोराने ढकलू लागले व दार फोडायला सरसावले,
पण त्या पुरुषांनी बाहेर हात काढून लोटाला घरात आपल्याकडे ओढून दार लावून घेतले.
आणि घराच्या दाराशी जी लहानथोर माणसे जमली होती त्यांना त्यांनी आंधळे करून टाकले; मग ती घर शोधून शोधून थकली.
ते पुरुष लोटाला म्हणाले, “तुझे आणखी कोणी येथे आहेत काय? तुझा जावई, तुझे मुलगे, तुझ्या मुली आणि तुझे दुसरे कोणी ह्या नगरात असेल त्यांना ह्या स्थानातून बाहेर काढ.
कारण आम्ही ह्या स्थानाचा नाश करणार आहोत. ह्या लोकांविषयी परमेश्वरापुढे फार ओरड झाली आहे आणि ह्या नगराचा नाश करण्यास परमेश्वराने आम्हांला पाठवले आहे.”
तेव्हा लोट बाहेर जाऊन आपल्या मुलींशी विवाह केलेल्या1 आपल्या जावयांना म्हणाला, “उठा, ह्या स्थानातून बाहेर पडा, कारण परमेश्वर ह्या नगराचा नाश करणार आहे;” परंतु त्याच्या जावयांना तो केवळ गंमत करत आहे असे भासले.
पहाट होताच दूतांनी लोटाला घाई करून म्हटले, “ऊठ, तुझी बायको व येथे असलेल्या तुझ्या दोन मुली ह्यांना घेऊन नीघ, नाहीतर ह्या नगराच्या शिक्षेत तुझा संहार होईल.”
पण तो दिरंगाई करू लागला, तेव्हा परमेश्वराची करुणा त्याच्यावर होती म्हणून त्या पुरुषांनी त्याच्या, त्याच्या बायकोच्या आणि दोन्ही मुलींच्या हातांना धरून त्यांना ओढून बाहेर काढले आणि नगराबाहेर आणून सोडले.
त्यांना बाहेर आणल्यावर दूत त्यांना म्हणाला, “आपला जीव घेऊन पळ; मागे पाहू नकोस व खोर्यात कोठे थांबू नकोस; डोंगराकडे पळ काढ, नाहीतर तुझा संहार होईल.”