YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 18:1-15

उत्पत्ती 18:1-15 MARVBSI

तो दिवसा भर उन्हाच्या वेळी डेर्‍याच्या दाराशी बसला असता परमेश्वराने मम्रेच्या एलोन राईत त्याला दर्शन दिले; त्याने आपली दृष्टी वर करून पाहिले तेव्हा त्याच्यासमोर तीन पुरुष उभे असलेले त्याला दिसले. त्याने आपल्या डेर्‍याच्या दारापासून धावत सामोरे जाऊन जमिनीपर्यंत लवून त्यांना नमन केले; तो म्हणाला, “हे प्रभू, माझ्यावर तुझी कृपादृष्टी असेल तर ये; तुझ्या दासापासून पुढे जाऊ नकोस; थोडे पाणी आणू द्या; तुम्ही आपले पाय धुऊन ह्या झाडाखाली विसावा घ्या. मी थोडी भाकर आणतो, तिचा आपल्या जिवास आधार करा, मग पुढे जा; ह्यासाठी तुमचे ह्या आपल्या दासाकडे येणे झाले असावे.” ते म्हणाले, “तू म्हणतोस ते कर.” तेव्हा अब्राहाम त्वरेने डेर्‍यात सारेकडे जाऊन म्हणाला, “तीन मापे सपीठ लवकर घे व ते मळून त्याच्या भाकरी कर.” अब्राहाम गुरांकडे धावत गेला व त्याने एक चांगले कोवळे वासरू निवडून चाकराकडे दिले; त्याने ते त्वरेने रांधले. नंतर अब्राहामाने दही, दूध व ते रांधलेले वासरू आणून त्याच्यापुढे ठेवले आणि ते जेवत असता तो त्यांच्याजवळ झाडाखाली उभा राहिला. मग ते त्याला म्हणाले, “तुझी बायको सारा कोठे आहे?” तो म्हणाला, “ती डेर्‍यात आहे.” मग तो म्हणाला, “पुढल्या वसंत ऋतूत (जीवनाच्या वेळेस) मी तुझ्याकडे खात्रीने परत येईन; तेव्हा तुझी बायको सारा हिला मुलगा होईल.” त्याच्यामागे डेर्‍याच्या दारी सारा हे ऐकत होती. अब्राहाम व सारा हे वृद्ध, वयातीत होते आणि स्त्रियांच्या रीतीप्रमाणे सारेला पाळी येण्याचे बंद झाले होते. तेव्हा सारा मनातल्या मनात हसून म्हणाली, “मी जख्ख म्हातारी झाले आहे. माझा धनीही वृद्ध झाला आहे, तर मला आता हे सुख मिळेल काय?” परमेश्वर अब्राहामाला म्हणाला, “सारा का हसली? मी आता अशी वृद्ध झाले असता मला खरोखर मुलगा होणार काय, असे ती का म्हणाली? परमेश्वराला काही असाध्य आहे काय? नेमलेल्या समयी वसंत ऋतूत मी तुझ्याकडे परत येईन तेव्हा सारेला मुलगा होईल.” तेव्हा सारा नाकारून म्हणाली, “मी हसले नाही;” कारण ती घाबरली होती; पण तो म्हणाला, “नाही, तू हसलीसच.”