YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 12:10-20

उत्पत्ती 12:10-20 MARVBSI

पुढे देशात दुष्काळ पडला; तेव्हा काही दिवस मिसरात जाऊन राहावे म्हणून अब्राम तिकडे निघून गेला, कारण त्या देशातला दुष्काळ फार तीव्र होता. तो मिसरात प्रवेश करणार तोच तो आपली बायको साराय हिला म्हणाला, “पाहा तू दिसायला सुंदर स्त्री आहेस हे मला ठाऊक आहे; तुला मिसरी लोक पाहतील तेव्हा ही ह्याची बायको आहे असे म्हणतील, आणि मला मारून टाकून तुला जिवंत ठेवतील. तर मी ह्याची बहीण आहे असेच तू सांग, म्हणजे तुझ्यामुळे माझे बरे होईल, आणि तुझ्या योगे माझा जीव वाचेल.” मग अब्राम मिसर देशात जाऊन पोहचला, तेव्हा ती स्त्री फार सुंदर आहे असे मिसर्‍यांनी पाहिले. फारोच्या सरदारांनी तिला पाहून फारोजवळ तिची प्रशंसा केली आणि तिला त्याच्या घरी नेऊन ठेवले. तिच्यामुळे त्याने अब्रामाचे बरे केले, आणि त्याला मेंढरे, बैल, गाढव, दास, दासी, गाढवी व उंट मिळाले. तरी अब्रामाची स्त्री साराय हिच्यामुळे परमेश्वराने फारो व त्याचे घराणे ह्यांना भारी पीडा भोगायला लावली. तेव्हा फारोने अब्रामाला बोलावून म्हटले, “तू मला हे काय केलेस? ही तुझी बायको आहे हे तू मला का नाही सांगितलेस? ती तुझी बहीण आहे म्हणून तू मला का सांगितलेस? मी तिला आपली बायको करण्यासाठी माझ्याकडे ठेवले होते; तर आता ही पाहा तुझी बायको, हिला घेऊन जा.” तेव्हा फारोने आपल्या दासांना त्याच्यासंबंधाने हुकूम केला, आणि त्यांनी त्याची बायको व त्याचे जे काही होते त्यासह त्याला वाटेला लावले.