YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गलतीकरांस पत्र 2

2
पौलाची कामगिरी यरुशलेमकरांना मान्य होते
1नंतर चौदा वर्षांनी बर्णबाबरोबर मी पुन्हा यरुशलेमेस वर गेलो. मी आपल्याबरोबर तीतालाही घेतले होते.
2मला प्रकटीकरण झाल्याप्रमाणे मी गेलो; ज्या सुवार्तेची मी परराष्ट्रीयांत घोषणा करत असतो, ती मी त्यांना निवेदन केली, परंतु जे प्रतिष्ठित होते त्यांना एकान्ती केली; नाहीतर मी व्यर्थ धावतो किंवा धावलो असे कदाचित झाले असते.
3तथापि माझ्याबरोबरचा तीत हा हेल्लेणी असताही त्यालादेखील सुंता करवून घेण्यास भाग पाडण्यात आले नाही;
4आणि गुप्तपणे आत आणलेल्या खोट्या बंधूंमुळेदेखील भाग पाडण्यात आले नाही; ते आम्हांला गुलामगिरीत घालण्याकरता ख्रिस्त येशूमध्ये आम्हांला जी मुक्तता मिळाली आहे ती हेरून पाहावी म्हणून गुप्तपणे आत आले होते;
5सुवार्तेचे सत्य तुमच्याजवळ राहावे म्हणून आम्ही त्यांना घटकाभरही वश होऊन मान्य झालो नाही.
6परंतु कोणीतरी प्रतिष्ठित म्हणून जे मानले जात होते, (ते कसेही असोत त्याचे मला काही नाही; माणसाला ‘देव तोंडावरून मानत नाही’) त्या प्रतिष्ठितांनी माझ्या सुवार्तेत काही भर घातली नाही,
7तर उलट, जसे सुंता झालेल्या लोकांना सुवार्ता सांगण्याचे काम पेत्राकडे सोपवले आहे, तसे सुंता न झालेल्या लोकांना सांगण्याचे काम माझ्याकडे सोपवले आहे असे त्यांनी पाहिले.
8(कारण ज्याने पेत्राला सुंता झालेल्या लोकांत प्रेषितपणा चालवायला शक्ती पुरवली त्याने मलाही परराष्ट्रीयांत तो चालवण्यास शक्ती पुरवली),
9आणि मला दिलेले कृपादान ओळखून याकोब, केफा व योहान हे जे आधारस्तंभ असे मानलेले होते, त्यांनी माझ्याबरोबर व बर्णबाबरोबर उजव्या हातांनी हस्तांदोलन केले, ते ह्यासाठी की, आपण देवाच्या कार्यात सहभागी आहोत हे दर्शवावे व आम्ही परराष्ट्रीयांकडे व त्यांनी सुंता झालेल्यांकडे जावे.
10मात्र आम्ही गरिबांची आठवण ठेवावी, अशी त्यांची इच्छा होती; आणि मी तर तीच गोष्ट करण्यास उत्कंठित होतो.
केफाचा (पेत्राचा) निषेध
11पुढे केफा अंत्युखियास आला तेव्हा तो दोषी असल्यामुळे मी त्याला तोंडावर अडवले.
12कारण याकोबाकडील कित्येक जण येण्यापूर्वी तो परराष्ट्रीयांच्या पंक्तीस बसत असे; परंतु ते आल्यावर तो सुंता झालेल्या लोकांना भिऊन माघार घेऊन वेगळा राहू लागला.
13त्याच्याबरोबर बाकीच्या यहूद्यांनीही ढोंग केले; ते इतके की बर्णबाही त्यांच्या ढोंगाने तिकडे ओढला गेला.
14परंतु सुवार्तेच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत नाहीत, असे मी पाहिले तेव्हा सर्वांसमक्ष मी केफाला म्हटले, “तू यहूदी असताही परराष्ट्रीयांसारखा वागतोस, यहूद्यांसारखा वागत नाहीस, तर परराष्ट्रीयांनी यहूद्यांसारखे वागावे म्हणून तू त्यांच्यावर जुलूम करतोस हे कसे?”
नियमशास्त्राची अपूर्णता
15आम्ही जन्मतः यहूदी आहोत, पापिष्ट परराष्ट्रीयांतले नाही;
16तरी मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही, तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे ठरतो, हे जाणून आम्हीही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला; ह्यासाठी की, आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कृत्यांनी नव्हे; कारण नियमशास्त्रातील कृत्यांनी ‘मनुष्यजातीपैकी कोणीही नीतिमान ठरणार नाही.’
17ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरण्यास पाहत असता आपणही पापी दिसून आलो तर ख्रिस्त पापाचा सेवक आहे काय? कधीच नाही.
18कारण जे मी पाडून टाकले ते मी पुन्हा उभारत असलो तर मी स्वत:ला उल्लंघन करणारा ठरवतो.
19मी नियमशास्त्राच्या द्वारे नियमशास्त्राला मेलो, ह्यासाठी की मी देवाकरता जगावे.
20मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे; आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो; आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे; त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वत:ला माझ्याकरता दिले.
21मी देवाची कृपा व्यर्थ करत नाही, कारण जर नीतिमत्त्व नियमशास्त्राच्या द्वारे असले तर ख्रिस्ताचे मरण विनाकारण झाले.

सध्या निवडलेले:

गलतीकरांस पत्र 2: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन