YouVersion लोगो
सर्च आयकॉन

एज्रा 8

8
1अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीत माझ्याबरोबर बाबेलहून आले त्यांच्या पितृकुळांचे प्रमुख व त्यांची वंशावळी येणेप्रमाणे :
2फिनहासाच्या वंशातला गेर्षोम, इथामाराच्या वंशातला दानीएल व दाविदाच्या वंशातला हट्टूश.
3शखन्याच्या वंशातला परोशाच्या कुळातला जखर्‍या व त्याच्याबरोबर एकशे पन्नास पुरुषांची गणती वंशावळीप्रमाणे झाली.
4पहथ-मवाबाच्या वंशातला एल्यहोवेनय बिन जरह्या व त्याच्याबरोबर दोनशे पुरुष.
5शखन्याच्या वंशांतला यहजीएलाचा पुत्र व त्याच्या-बरोबर तीनशे पुरुष.
6आदीनाच्या वंशातला एबद बिन योनाथान व त्याच्याबरोबर पन्नास पुरुष.
7एलामाच्या वंशातला यशाया बिन अथल्या व त्याच्याबरोबर सत्तर पुरुष.
8शफाट्याच्या वंशातला जबद्या बिन मीखाएल व त्याच्याबरोबर ऐंशी पुरुष.
9यवाबाच्या वंशातला ओबद्या बिन यहीएल व त्याच्याबरोबर दोनशे अठरा पुरुष.
10शलोमिथाच्या वंशातला योसिफ्याचा पुत्र व त्याच्याबरोबर एकशे साठ पुरुष
11बेबाईच्या वंशातला जखर्‍या बिन बेबाई व त्याच्या-बरोबर अठ्ठावीस पुरुष.
12अजगादाच्या वंशातला योहानान बिन हक्काटान व त्याच्याबरोबर एकशे दहा पुरुष.
13अदोनीकामाच्या वंशातले जे शेवटचे त्यांची नावे ही : अलीफलेट, यइएल व शमाया आणि त्यांच्याबरोबर साठ पुरुष.
14बिग्वईच्या वंशांतले ऊथय व जब्बूद व त्यांच्याबरोबर सत्तर पुरुष.
15अहवा नदीला जी नदी मिळते तिच्याजवळ मी त्यांना जमवले; तेथे आम्ही डेरे देऊन तीन दिवस राहिलो; आणि मी लोकांची व याजकांची पाहणी केली तेव्हा मला लेवीच्या वंशातले कोणी दिसले नाहीत.
16मग मी निरोप पाठवून अलियेजर, अरीएल, शमाया, एलनाथान, यारीब, एलनाथान, नाथान, जखर्‍या व मशुल्लाम ह्या प्रमुखांना आणि योयारीब व एलनाथान ह्या सुज्ञ पुरुषांना बोलावून आणले.
17मी त्यांना कासिफ्या नावाच्या स्थानाचा नायक इद्दो ह्याच्याकडे पाठवले आणि आमच्याकडे आमच्या देवाच्या मंदिराप्रीत्यर्थ सेवाचाकरी करणारे घेऊन यावेत म्हणून कासिफ्या येथे इद्दो व त्याचे बांधव नथीनीम ह्यांना काय सांगावे हे मी त्यांना कळवले.
18आमच्या देवाचा आमच्यावर वरदहस्त असल्यामुळे त्यांनी आमच्याकडे महली बिन लेवी बिन इस्राएल ह्याच्या वंशातला एक समंजस मनुष्य आणला; आणि शेरेब्या व त्याचे पुत्र व बांधव असे अठरा जण आणले;
19हशब्या व त्याच्याबरोबर मरारी वंशातील यशाया आणि त्याचे बांधव व पुत्र मिळून वीस जण आणले.
20याशिवाय दावीद व सरदार ह्यांनी लेव्यांच्या सेवेसाठी नेमून दिलेल्या नथीनीमांपैकी दोनशे वीस आणले; ह्या सर्वांची नावे नोंदली.
21मग मी अहवा नदीतीरी उपास करण्याचे जाहीर केले; त्याचा हेतू असा की आम्ही देवासमोर दीन व्हावे आणि आमच्यासाठी, आमच्या मुलाबाळांसाठी आणि आमच्या सर्व धनासाठी बिनधोक मार्ग प्राप्त व्हावा असे आम्ही आमच्या देवासमोर दीन होऊन मागावे.
22वाटेने शत्रूंपासून आमचा बचाव होण्यासाठी राजाकडे शिपाई व घोडेस्वार ह्यांची टोळी मागून घेण्याची मला लाज वाटली; कारण आम्ही राजाला असे बोलून चुकलो होतो की, “आमच्या देवाला शरण आलेल्या सर्वांवर त्याचा वरदहस्त असतो, पण जे त्याचा त्याग करतात त्यांच्यावर त्याचे बल व त्याचा क्रोध ही प्रकट होतात.”
23ह्यास्तव आम्ही उपास करून आपल्या देवाची प्रार्थना केली ती त्याने ऐकली.
24मग मी याजकांपैकी शेरेब्या, हशब्या व त्यांचे दहा बांधव अशा बारा प्रमुख पुरुषांना निराळे केले.
25जे सोनेरुपे व जी पात्रे राजा, त्याचे मंत्री, त्याचे सरदार व तेथे असलेले सर्व इस्राएल ह्यांनी आमच्या देवाच्या मंदिराप्रीत्यर्थ अर्पण केली होती ती तोलून मी त्यांच्या स्वाधीन केली;
26मी त्यांच्या हाती साडेसहाशे किक्कार चांदी, शंभर किक्कार चांदीची पात्रे, शंभर किक्कार1 सोने,
27हजार दारिक2 सोन्याचे वीस कटोरे आणि सुवर्णतुल्य उजळ पितळेची दोन पात्रे मी त्यांना तोलून दिली.
28मी त्यांना म्हणालो, “तुम्ही परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र आहात, व ही पात्रेही पवित्र आहेत; हे सोनेरुपे तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ स्वसंतोषाचे अर्पण म्हणून आहे.
29सावध राहा; यरुशलेमेत मुख्य याजक, लेवी आणि इस्राएलाच्या पितृकुळातले सरदार ह्यांच्यासमोर परमेश्वराच्या मंदिराच्या कोठड्यांत ही सर्व तोलून होईपर्यंत ह्यांचे रक्षण करा.”
30मग यरुशलेमेतील आमच्या देवाच्या मंदिराप्रत नेण्यासाठी याजक व लेवी ह्यांनी ते सोनेरुपे व ती पात्रे तोलून घेतली.
31पहिल्या महिन्याच्या द्वादशीस अहवा नदीपासून कूच करून आम्ही यरुशलेमेचा मार्ग धरला. आमच्या देवाचा वरदहस्त आमच्यावर असल्यामुळे त्याने शत्रूंपासून व वाटेत घात करण्यास टपून बसणार्‍यांपासून आमचे रक्षण केले.
32आम्ही यरुशलेमेस पोहचून तेथे तीन दिवस राहिलो.
33चौथ्या दिवशी ते सोनेरुपे व ती पात्रे आमच्या देवाच्या मंदिरात तोलून मरेमोथ बिन उरीया याजकाच्या हवाली केली; त्याच्याबरोबर एलाजार बिन फिनहास, योजाबाद बिन येशूवा आणि नोवद्या बिन बिन्नुई हे लेवी होते.
34त्या सर्व वस्तू मोजून तोलल्या व त्या सर्व तोलाची त्या वेळी नोंद केली.
35परदेशातील बंदिवासातून परत आलेल्यांनी इस्राएलाच्या देवाला होमबली अर्पण केले; त्यांनी सर्व इस्राएलासाठी पापार्पण म्हणून बारा गोर्‍हे, शहाण्णव एडके, सत्त्याहत्तर कोकरे व बारा बकरे अर्पण केले; ही सर्व परमेश्वराप्रीत्यर्थ होमार्पणे होती.
36मग त्यांनी राजाचे फर्मान महानदाच्या पश्‍चिमेकडील प्रांतांवरील राजाचे मुतालिक व प्रांताधिपती ह्यांना दिले; त्यांनी इस्राएल लोकांना देवाच्या मंदिराच्या कामी साहाय्य केले.

सध्या निवडलेले:

एज्रा 8: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन