YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 4

4
यरुशलेमेच्या वेढ्याचे चित्र
1हे मानवपुत्रा, एक वीट घेऊन आपल्यासमोर मांड; तिच्यावर यरुशलेम नगरीचे चित्र काढ.
2तिला वेढा पडला आहे, तिच्यासमोर बुरूज रचून मोर्चे बांधले आहेत, तिच्यापुढे तळ पडला आहे, टक्कर देऊन भिंत पाडण्याची यंत्रे तिच्याभोवती लागली आहेत, असे चित्र काढ.
3मग तू एक लोखंडी कढई घे; ती तुझ्यामध्ये व त्या नगरीमध्ये जशी काय लोखंडी भिंत म्हणून ठेव; तू आपले तोंड तिच्याकडे कर; तिला वेढ्याच्या स्थितीत आण; तू तिला वेढा घालणारा हो. हे इस्राएल घराण्यास चिन्ह होईल.
4आणखी तू आपल्या डाव्या कुशीवर नीज व इस्राएल घराण्याचा अधर्म त्या कुशीवर ठेव; जितके दिवस तू त्या कुशीवर निजून राहशील, तितके दिवस त्यांच्या अधर्माचा भार वाहत राहा.
5कारण त्यांच्या अधर्माच्या वर्षांइतके दिवस मी तुझ्या हिशोबी गणले आहेत; तीनशे नव्वद दिवस तुला इस्राएल घराण्याचा भार वाहायचा आहे.
6पुन्हा ते दिवस संपल्यावर तू उजव्या कुशीवर नीज व चाळीस दिवस यहूदा घराण्याच्या अधर्माचा भार वाहा; प्रत्येक वर्षाबद्दल तुझ्या हिशोबी मी एक दिवस धरला आहे.
7तू आपले तोंड व उघडा हात यरुशलेमेच्या वेढ्याच्या चित्राकडे रोखून धर व तिच्याविरुद्ध संदेश दे.
8पाहा, मी तुला बंधनांनी बांधतो, म्हणजे तू आपल्या वेढ्याचे दिवस संपवीपर्यंत ह्या कुशीचा त्या कुशीला वळायचा नाहीस.
9तू गहू, जव, पावटे, मसूर, बाजरी व काठ्या गहू घेऊन एका पात्रात घाल व आपल्यासाठी त्याची भाकर कर; तू आपल्या कुशीवर निजशील त्या दिवसांच्या संख्येच्या मानाने तीनशे नव्वद दिवस तुला ती खायची आहे.
10तू जे अन्न खाशील ते वजनाने रोजचे वीस शेकेल असून ते तू मधून मधून खा
11आणि पाणी मापाने एक षष्ठांश हिन1 पी; ते तू मधून मधून पी.
12जवाच्या भाकरीप्रमाणे ती भाकर करून खा, ती लोकांसमक्ष मानवी विष्ठेवर भाज.”
13परमेश्वर म्हणाला, “ह्याप्रमाणे मी इस्राएल वंशजांना ज्या राष्ट्रांमध्ये हाकून देईन त्यांत ते आपली अमंगळ भाकर खातील.”
14तेव्हा मी म्हणालो, “अहा! प्रभू परमेश्वरा! पाहा, मी कधी विटाळलो नाही; मी लहानपणापासून आजवर कधी कोणत्याही आपोआप मेलेल्या किंवा पशूंनी फाडून मारलेल्या प्राण्यांचे मांस खाल्ले नाही; अमंगळ मांस माझ्या तोंडास शिवले नाही.”
15मग तो मला म्हणाला, “पाहा, मानवी विष्ठेऐवजी गाईचे शेण वापरण्याची मी तुला परवानगी देतो; त्याच्या गोवर्‍यांनी आपली भाकर भाज.”
16तो आणखी म्हणाला, “मानवपुत्रा, पाहा, मी यरुशलेमेत भाकरीचा आधार तोडीन म्हणजे लोक कष्टी होऊन भाकर तोलून खातील, व भयभीत होऊन पाणी मापून पितील.
17कारण भाकर व पाणी ह्यांची तूट पडेल, लोक एकमेकांकडे पाहून भयचकित होतील आणि अधर्मावस्थेत क्षय पावतील.”

सध्या निवडलेले:

यहेज्केल 4: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन