YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 36:16-38

यहेज्केल 36:16-38 MARVBSI

परमेश्वराचे वचन मला पुन्हा प्राप्त झाले की, “मानवपुत्रा, इस्राएल घराणे देशात वस्ती करून राहिले तेव्हा त्यांनी आपल्या आचाराने व कृतींनी तो देश भ्रष्ट केला; त्यांचा आचार माझ्यासमक्ष ऋतुमती स्त्रीच्या विटाळाप्रमाणे होता. त्यांनी देशात रक्तपात केला व आपल्या मूर्तींनी तो भ्रष्ट केला म्हणून मी देशावर आपल्या संतापाचा वर्षाव केला. मी त्यांची राष्ट्रांमध्ये पांगापांग केली, देशोदेशी त्यांची दाणादाण झाली; त्यांच्या आचाराप्रमाणे व कृतींप्रमाणे मी त्यांचा न्याय केला. ज्या ज्या देशात ते गेले तेथे तेथे त्यांनी माझ्या पवित्र नामास बट्टा लावला; लोक त्यांच्याविषयी म्हणत की, ‘हे परमेश्वराचे लोक आहेत, हे त्याच्या देशातून बाहेर निघाले आहेत.’ परंतु इस्राएल घराणे ज्या ज्या राष्ट्रांत गेले तेथे तेथे त्याने माझ्या पवित्र नामास बट्टा लावला, तेव्हा मी आपल्या नामास जपलो. ह्याकरता इस्राएल घराण्यास सांग की, प्रभू परमेश्वर म्हणतो, हे इस्राएल घराण्या, मी हे तुमच्याकरता करत नाही, तर तुम्ही राष्ट्राराष्ट्रांत जाऊन माझ्या पवित्र नामास बट्टा लावला म्हणून माझ्या नामाप्रीत्यर्थ मी हे करत आहे. तुम्ही माझ्या थोर नामास राष्ट्रांसमोर बट्टा लावल्यामुळे त्या राष्ट्रांनी माझे नाम अपवित्र मानले, ते ती पवित्र मानतील असे मी करीन आणि त्या राष्ट्रांदेखत तुमच्या ठायी मला पवित्र मानतील तेव्हा राष्ट्रांना समजेल की मी परमेश्वर आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. कारण मी तुम्हांला राष्ट्रांतून काढून आणीन, सर्व देशांतून मी तुम्हांला जमा करून तुमच्या देशात आणीन. मी तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडीन, म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल; तुमची सर्व मलिनता व तुमच्या सर्व मूर्ती ह्यांपासून मी तुमची शुद्धी करीन. मी तुम्हांला नवे हृदय देईन, तुमच्या ठायी नवा आत्मा घालीन; तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हांला मांसमय हृदय देईन. मी तुमच्या ठायी माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल, माझे निर्णय पाळून त्यांप्रमाणे आचरण कराल असे मी करीन. मी तुमच्या पूर्वजांना दिलेल्या देशात तुम्ही वस्ती कराल, आणि तुम्ही माझी प्रजा व मी तुमचा देव असे होईल. मी तुमच्या सर्व मलिनतेपासून तुम्हांला मुक्त करीन. मी धान्यावर हुकूम करून त्याची विपुलता करीन, तुमच्यावर दुष्काळ आणणार नाही. वृक्षांची फळे व शेतांचा उपज ह्यांची वृद्धी मी करीन, म्हणजे राष्ट्रांमध्ये तुम्हांला ह्यापुढे दुष्काळामुळे होणारी विटंबना भोगावी लागणार नाही. तुम्हांला आपल्या दुष्कर्माचे व अनाचाराचे स्मरण होईल; तुमचे अधर्म व अमंगळ कृत्ये ह्यांमुळे तुमचा तुम्हांलाच वीट वाटेल. प्रभू परमेश्वर म्हणतो, हे मी तुमच्याकरता करीत नाही हे तुम्हांला ठाऊक असू द्या; हे इस्राएल घराण्या, तुम्ही आपल्या आचाराविषयी लज्जित व फजीत व्हा. प्रभू परमेश्वर म्हणतो, मी तुमचा सर्व अधर्म घालवून तुम्हांला स्वच्छ करीन, तेव्हा नगरे वसतील व पडीत जागा बांधण्यात येतील असे मी करीन. आल्यागेल्यास वैराण दिसणारा प्रदेश नांगरण्यात येईल. तेव्हा लोक म्हणतील, ‘ही भूमी वैराण झाली होती ती आता एदेन बागेसारखी झाली आहे. ओसाड, उजाड व उद्ध्वस्त झालेल्या नगरांची तटबंदी होऊन त्यांत वस्ती झाली आहे.’ जी राष्ट्रे तुमच्यासभोवती निभावून राहतील त्यांना समजेल की मी परमेश्वर उद्ध्वस्त झालेली स्थाने बांधून काढतो. उजाड झालेल्याची लागवड करतो. मी परमेश्वर जे बोललो आहे ते करीनच. प्रभू परमेश्वर म्हणतो, आणखी मी असे करावे म्हणून इस्राएल घराण्यास माझी विनवणी करणे भाग पडेल; कळपाप्रमाणे मी त्यात माणसांची वृद्धी करीन. पवित्र यज्ञपशूंचा कळप, यरुशलेमेतील सणाचा कळप ह्यांप्रमाणे ओसाड नगरे मनुष्याच्या कळपांनी भरून जातील; तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.”