तेव्हा अकराव्या वर्षी, पहिल्या महिन्याच्या सप्तमीस परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, “मानवपुत्रा, मिसरी राजा फारो ह्याचा भुज मी मोडला आहे; पाहा, त्याला पुन्हा तलवार धरण्याची शक्ती यावी म्हणून त्याला औषधोपचार करून पट्टी बांधायची ती कोणी बांधली नाही. ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, मी मिसरी राजा फारो ह्याच्याविरुद्ध आहे; त्याचा शाबूत व मोडका असे दोन्ही हात मी तोडून टाकीन, त्याच्या हातातून तलवार गळेल असे मी करीन. मी मिसर्यांना राष्ट्रांमध्ये पांगवीन, त्यांना देशोधडीस लावीन, मी बाबेलच्या राजाचे भुज बळकट करीन, मी आपली तलवार त्याच्या हाती देईन; पण मी फारोचे भुज असे मोडीन की, एखाद्या भयंकर घायाळ झालेल्या मनुष्याप्रमाणे तो त्याच्यापुढे आक्रोश करील. मी बाबेलच्या राजाचे भुज बळकट करीन आणि फारोचे भुज गळतील; मी मिसर देशावर उगारण्यासाठी बाबेलच्या राजाच्या हाती तलवार देईन तेव्हा त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे. मी मिसर्यांना राष्ट्रांमध्ये विखरीन, त्यांना देशोधडीस लावीन. तेव्हा त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.”
यहेज्केल 30 वाचा
ऐका यहेज्केल 30
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यहेज्केल 30:20-26
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ