YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 29

29
मिसर देशाविषयी भविष्य
1दहाव्या वर्षी दहाव्या महिन्याच्या द्वादशीस परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
2“मानवपुत्रा, मिसर देशाचा राजा फारो ह्याच्याकडे आपले तोंड करून त्याच्याविरुद्ध व सर्व मिसर देशाविरुद्ध संदेश दे.
3त्याच्याबरोबर बोल; त्याला सांग : प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, हे मिसर देशाच्या फारो राजा, आपल्या नद्यांत पडून राहणार्‍या मोठ्या मगरा, तू जो म्हणतोस की, ‘नदी माझी आहे, मी ती स्वतःसाठी निर्माण केली आहे,’ त्या तुझ्याविरुद्ध मी आहे.
4मी तुझ्या जाभाडात गळ टोचीन, मी तुझ्या नद्यांतले मासे तुझ्या खवल्यांना चिकटवीन, मी तुला तुझ्या खवल्यांना चिकटलेल्या नद्यांतल्या माशांसह तुझ्या नद्यांमधून बाहेर खेचून काढीन.
5मी तुला व तुझ्या नद्यांतल्या सर्व माशांना सोडून देईन; तू उघड्या मैदानात पडून राहशील; तुला कोणी उचलून आणणार नाही किंवा तुझी कोणी जुळवाजुळव करणार नाही, तर तू वनपशूंना व आकाशातील पाखरांना खाद्य होशील असे मी करीन.
6तेव्हा मिसर देशाचे सर्व रहिवासी समजतील की, मी परमेश्वर आहे; कारण इस्राएल घराण्याला मिसराचा केवळ बोरूसारखा आधार होता.
7त्यांनी तुला हातांनी धरले तेव्हा तू चिडून त्या सर्वांचे खांदे फोडून टाकलेस; ते तुझ्यावर टेकले असता तू मोडून गेलास व तू सर्वांच्या कंबरा खचवल्यास.
8ह्याकरता प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, मी तुझ्यावर तलवार आणीन आणि तुझ्यातून मनुष्य व पशू ह्यांचा उच्छेद करीन.
9मिसर देश ओसाड व वैराण होईल तेव्हा त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे; कारण तो म्हणाला, ‘नदी माझी आहे, मी ती निर्माण केली आहे’.
10तर पाहा, मी तुझ्या नद्यांवर उठेन; मी मिग्दोलापासून सवेनेपर्यंत, कूशाच्या सीमेपर्यंत, मिसर देश ओसाड व उजाड करीन.
11मनुष्याचा पाय त्याला लागायचा नाही, पशूच्या पायाचा त्याला स्पर्श होणार नाही; चाळीस वर्षे त्यात कोणी वस्ती करणार नाही.
12वैराण केलेल्या देशांमध्ये मी मिसर देश वैराण करीन, उजाड केलेल्या नगरांमध्ये मी त्याची नगरे चाळीस वर्षे उजाड करीन; मी मिसर्‍यांना राष्ट्रांमध्ये विखरीन, त्यांना देशोधडीस लावीन.
13प्रभू परमेश्वर म्हणतो की, चाळीस वर्षे संपल्यावर मिसरी लोकांची ज्या राष्ट्रांत पांगापांग झाली त्यांतून मी त्यांना गोळा करीन;
14मी मिसर देशाचा बंदिवास उलटवीन, मी पथ्रोस देशात त्यांच्या जन्मभूमीस त्यांना परत आणीन; तेथे त्यांचे एक खालच्या दर्जाचे राज्य होईल.
15सर्व राज्यांमध्ये ते खालच्या दर्जाचे होईल; ते इत:पर इतर राष्ट्रांवर वरचढ होणार नाही; मी त्यांना कनिष्ठ करून ठेवीन म्हणजे ते इतर राष्ट्रांवर सत्ता करणार नाहीत.
16ते ह्यापुढे इस्राएल घराण्याला आधार होणार नाहीत; त्यांच्याकडे त्यांचे मन गेले तर त्यांना त्यांच्या पातकाचे स्मरण होईल; तेव्हा त्यांना समजेल की मी प्रभू परमेश्वर आहे.”
17पुन्हा सत्ताविसाव्या वर्षी, पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेस, परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
18“मानवपुत्रा, बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याने सोरेस वेढा घातला तेव्हा त्याने आपल्या सैन्यास भारी कष्ट करायला लावले; सर्वांच्या डोक्यांना टक्कले पडली, खांद्यांची सालटी निघाली, तरी त्याने जो खटाटोप केला त्याचा त्याला किंवा त्याच्या सैन्याला योग्य मोबदला मिळाला नाही.
19ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याला मी मिसराचा मुलूख देईन; तेव्हा तो त्यांचा समुदाय हिरावून नेईल, त्याने लुटलेले तो लुटील; त्याने हरण केलेले तो हरण करील, असा त्याच्या सैन्यास मोबदला मिळेल.
20त्याच्या श्रमाचा मोबदला म्हणून मी त्याला मिसराचा मुलूख देईन, कारण हे श्रम त्यांनी माझ्यासाठी केले, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
21त्या दिवशी इस्राएल घराण्यास एक शृंग उगवेल असे मी करीन व त्यांच्यामध्ये तुझे तोंड उघडेल असे करीन; तेव्हा त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.”

सध्या निवडलेले:

यहेज्केल 29: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन