पुन्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
“मानवपुत्रा, पाहा, मी तुझ्या नेत्रांना जे प्रिय ते सपाट्यासरशी तुझ्यापासून काढून घेतो; तरी तू शोक करणार नाहीस, रडणार नाहीस, अश्रू गाळणार नाहीस.
उसासा मुकाट्याने टाक; मृतांसाठी शोक करू नकोस, डोक्याला शिरोभूषण घाल, पायांत जोडा घाल, आपले ओठ झाकू नकोस, सुतकात लोक अन्न पाठवतात ते खाऊ नकोस.”
सकाळी मी लोकांत हे म्हणालो, आणि संध्याकाळी माझी बायको मेली; तेव्हा मला आज्ञा झाली होती तसे मी दुसर्या दिवशी सकाळी केले.
ह्यावरून लोक मला म्हणाले, “तू हे करतोस त्याचा आमच्याशी काय संबंध आहे ते आम्हांला सांगशील काय?”
मी त्यांना म्हणालो, “परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले आहे की,
‘इस्राएलाच्या घराण्यास असे सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो : पाहा, तुमच्या बळाचा आधार, तुमच्या नेत्रांना प्रिय, तुमच्या जिवाचा जिव्हाळा, असे जे माझे पवित्रस्थान ते मी भ्रष्ट करीन आणि तुम्ही मागे ठेवलेले तुमचे कन्यापुत्र तलवारीने पडतील.
मग मी केले आहे तसे तुम्ही कराल, तुम्ही ओठ झाकणार नाही व सुतकात लोक अन्न पाठवतात ते तुम्ही खाणार नाही.
तुम्ही आपल्या डोक्यांस शिरोभूषणे घालाल, पायांत जोडे घालाल; तुम्ही शोक करणार नाही, रडणार नाही, तर आपल्या अधर्माने झुराल व एकमेकांना पाहून उसासे टाकाल.
ह्या प्रकारे यहेज्केल तुम्हांला चिन्हवत होईल; त्याने केले त्याप्रमाणे तुम्ही कराल; हे घडून येईल तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.’
“हे मानवपुत्रा, त्यांचे बळ, त्यांचा वैभवमूलक हर्ष, त्यांच्या नेत्रांना प्रिय वाटणार्या वस्तू, त्यांच्या जिवाचा इष्टविषय आणि त्यांचे कन्यापुत्र मी त्यांच्यापासून हरण करीन;
त्या दिवशी निभावलेला एखादा माणूस तुझ्या कानावर हे वर्तमान घालण्यास तुझ्याकडे येईल.
त्या दिवशी त्या निभावलेल्या माणसाबरोबर बोलण्यास तुझे तोंड उघडेल; तू बोलशील, ह्यापुढे तू स्तब्ध राहणार नाहीस; असा तू त्यांना चिन्हवत होशील, म्हणजे त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.”