YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 16

16
बेइमान यरुशलेम
1पुन्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
2“मानवपुत्रा, यरुशलेमेची अमंगळ कृत्ये तिच्या लक्षात आणून दे.
3असे म्हण, प्रभू परमेश्वर यरुशलेमेस म्हणतो, तुझे मूळ व उत्पत्ती ही कनान देशातली आहेत; तुझा बाप अमोरी व तुझी आई हित्तीण होती.
4तुझ्या जन्माविषयी म्हटले तर तू जन्मलीस तेव्हा तुझी नाळ कापली नाही, तुला पाण्याने धुऊन स्वच्छ केले नाही, तुझ्या अंगाला मीठ चोपडले नाही व तुला बाळंत्यात गुंडाळले नाही.
5तुझी करुणा येऊन ह्यांतले कोणतेही करावे अशी तुझ्यावर कोणाची दयादृष्टी झाली नाही; तर तू जन्मलीस तेव्हा तुला अमंगळ समजून शेतात टाकून दिले होते.
6मी तुझ्याजवळून जाताना तुला आपल्या रक्तात लोळताना पाहिले, तेव्हा मी तुला म्हणालो, ‘तू आपल्या रक्तात लोळत आहेस तरी जिवंत राहा;’ असेच मी तुला म्हणालो.
7शेतातले बीज वाढून सहस्रपट होते तशी मी तुझी वृद्धी केली; तू वाढून उंच झालीस, तू अति सुंदर झालीस, तुला ऊर फुटले, तुझे केस वाढले तरी तू उघडीनागडी होतीस.
8मग तुझ्याजवळून जाताना मी तुला पाहिले, तर ती वेळ तुझ्या प्रेमविकासाची होती; तेव्हा मी तुझ्यावर पदर घालून तुझी नग्नता झाकली. प्रभू परमेश्वर म्हणतो, तेव्हा मी शपथ वाहून तुझ्याबरोबर करार केला व तू माझी झालीस.
9मी तुला पाण्याने न्हाऊ घातले, तुझ्यावरचे रक्त धुऊन काढले व तुला तेलाने माखले.
10तुला वेलबुट्टीची वस्त्रे लेववली, उत्तम चर्मी जोडा तुझ्या पायात घातला, तुझ्या मस्तकाला उत्तम तागाचे वस्त्र गुंडाळले व तुला रेशमी ओढणी पांघरवली.
11मी तुला दागिन्यांनी सजवले, तुझ्या हातांत बांगड्या घातल्या व गळ्यात गळसरी घातली.
12मी तुझ्या नाकात नथ घातली, कानांत बाळ्या घातल्या, तुझ्या डोक्याला उत्तम शिरोभूषण घातले.
13तू सोन्यारुप्याने नटलीस; तुझा पेहराव उत्तम ताग, रेशीम व जरतारी ह्यांचा होता; तुला भोजनास सपीठ, मध व तेल हे असत; तू अति सुंदर होतीस व तू राजवैभवाला पोहचली होतीस.
14तुझ्या सौंदर्यामुळे तुझी कीर्ती राष्ट्रांत पसरली; कारण मी तुला दिलेल्या तेजाने तुझे सौंदर्य अप्रतिम झाले, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
15तू तर आपल्या सौंदर्यावर भरवसा ठेवून आपल्या कीर्तीच्या जोरावर शिंदळकी केलीस, आल्यागेल्याबरोबर शिंदळकीचा तू सपाटा चालवलास; तुझे सौंदर्य त्यांना लुटण्यास सापडले.
16तू आपली वस्त्रे घेऊन रंगीबेरंगी उच्च स्थाने आपणांसाठी सजवलीस आणि कधी झाली नाही व पुन्हा कधी व्हायची नाही अशी शिंदळकी त्यांवर केलीस.
17मी दिलेल्या सोन्यारुप्याचे शोभिवंत दागिने घेऊन तू त्यांच्या पुरुषमूर्ती केल्यास व त्यांच्याबरोबर शिंदळकी केलीस;
18तू आपली वेलबुट्टीची वस्त्रे घेऊन त्यांना लेववली; मी दिलेल्या तेलाचा व धूपाचा तू त्यांना नैवेद्य दाखवलास.
19मी भाकर, सपीठ, तेल व मध तुला देत असे व तुला भरवत असे, तीही तू त्यांच्यापुढे सुगंधी अर्पण ठेवलेस म्हणून हे असे घडत असे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
20आणखी माझ्यापासून तुला पुत्र व कन्या ही झालीं, ती तू घेऊन त्यांना खाऊन टाकण्यासाठी बळी म्हणून अर्पण केलीस. ह्या तुझ्या शिंदळक्या तुला पुरेशा झाल्या नाहीत;
21म्हणून तू माझ्या पुत्रांना वधून त्यांचा मूर्तींप्रीत्यर्थ अग्नीत होम केलास काय?
22ही सर्व अमंगळ कृत्ये व शिंदळक्या करताना तू लहानपणी उघडीनागडी असून आपल्या रक्तात लोळत होतीस ह्याची तुला कधी आठवण झाली नाही.
23तू ही दुष्कर्मे केल्यावर (प्रभू परमेश्वर म्हणतो, तुला धिक्कार असो! तुला धिक्कार असो!) असे झाले की,
24तू आपणासाठी कमानदार घर बांधलेस, रस्त्यारस्त्यांवर तू आपणासाठी उंच स्थाने केलीस.
25तू रस्त्यांच्या नाक्यानाक्यांवर आपली उंच स्थाने बांधलीस, आपले सौंदर्य भ्रष्ट केलेस, आल्यागेल्या सर्वांपुढे आपले पाय पसरून मनस्वी शिंदळकी केलीस.
26मोठ्या शरीराचे तुझे शेजारी मिसरी लोक ह्यांच्याबरोबर तू शिंदळकी केलीस; मला चिडवण्यासाठी तू मनस्वी शिंदळकी केलीस;
27तेव्हा पाहा, मी आपला हात तुझ्यावर उगारून तुझे नित्याचे अन्न कमी केले आणि ज्यांना तुझे शिंदळकीचे वर्तन लज्जास्पद वाटते त्या तुझा द्वेष करणार्‍या पलिष्ट्यांच्या कन्यांच्या स्वाधीन तुला केले.
28तुझी तृप्ती म्हणून कधी होत नाही, ह्याकरता तू अश्शूर्‍यांबरोबरही शिंदळकी केलीस; हो, त्यांच्याबरोबर तू शिंदळकी केलीस तरीही तुझी तृप्ती होईना.
29व्यापार्‍यांचा1 म्हणजे खास्द्यांचा देश तेथपर्यंत तू मनस्वी शिंदळकी चालवलीस तरी त्यानेही तुझी तृप्ती होईना.
30प्रभू परमेश्वर म्हणतो, तू स्वच्छंदी वेश्येच्या कृतीप्रमाणे हे सर्व केलेस; तेव्हा तुझे मन किती दुर्बळ आहे!
31नाक्यानाक्यांवर तू आपली कमानदार घरे बांधलीस व रस्त्यारस्त्यांनी उच्च स्थाने बांधलीस. पण तू शिंदळकीच्या वेतनाची पर्वा केली नाहीस, ह्यात तू वेश्येची रीत सोडलीस.
32तू तर पतीला सोडून परपुरुष घेणार्‍या जारिणी स्त्रीप्रमाणे आहेस!
33लोक वेश्येस वेतन देतात; पण तू उलट आपल्या सर्व जारांना वेतन देतेस, त्यांनी चोहोकडून येऊन तुझ्याबरोबर शिंदळकी करावी म्हणून तू त्यांना लालूच दाखवतेस.
34तुझ्या शिंदळकीची रीत इतर स्त्रियांच्या उलट आहे; कोणी व्यभिचारी पुरुष तुझ्यामागून येत नाही, तुला कोणी वेतन देत नाही, तर उलट तू त्यांना वेतन देतेस, हे तुझे वर्तन विपरीत आहे.
35ह्याकरता अगे वेश्ये, परमेश्वराचे वचन ऐक :
36प्रभू परमेश्वर म्हणतो, तू आपला पैका उधळलास,2 आपल्या जारांबरोबर शिंदळकी करून आपली लाज दाखवलीस, तू आपल्या मूर्तींशी अमंगळ कृत्ये केलीस आणि आपल्या मुलांचे रक्त त्यांना अर्पण केलेस;
37म्हणून पाहा, ज्यांना तू खूश केलेस, प्रेमपात्र व द्वेषपात्र असे जे तुझे सर्व जार, त्यांना मी चोहोंकडून तुझ्याविरुद्ध जमा करीन, त्यांच्यापुढे तुझी लाज उघडी करीन म्हणजे ते तुझी सारी लाज पाहतील.
38जारिणी व रक्तपाती स्त्रिया ह्यांचा न्याय करावा तसा मी तुझा न्याय करीन आणि क्रोधाने व ईर्ष्येने मी तुझा रक्तपात करीन.
39मी तुला त्यांच्या हाती देईन, म्हणजे ते तुझी कमानदार घरे उद्ध्वस्त करतील, तुझी उच्च स्थाने पाडून टाकतील; तुझी वस्त्रे हिरावून घेऊन व तुझे उंची जवाहीर काढून घेऊन तुला उघडीनागडी करून सोडतील.
40ते तुझ्याविरुद्ध मंडळी जमवून आणून तुला दगडमार करतील व आपल्या तलवारींनी तुला भोसकतील.
41ते तुझी घरे अग्नीने जाळतील आणि बहुत स्त्रियांदेखत तुला शासन करतील; ह्या प्रकारे तुझी शिंदळकी मी बंद करीन, आणि ह्यापुढे तू कोणाला वेतन देणार नाहीस.
42तेव्हा तुझ्यावरचा माझा संताप मी शांत करीन; तुझ्याविषयीची माझी ईर्ष्या नाहीशी होईल; मी शांत होईन, पुन्हा कोप करणार नाही.
43तू आपल्या तरुणपणाच्या दिवसांचे स्मरण ठेवले नाहीस, तर हे सर्व करून मला चिडवलेस, म्हणून पाहा, प्रभू परमेश्वर म्हणतो, तुझ्या अनाचाराचे प्रतिफळ मी तुझ्या माथी लादीन, म्हणजे आपल्या इतर सर्व अमंगळ कर्मांत आणखी शिंदळकीची भर तू घालणार नाहीस.
44पाहा, म्हणी योजणारे सर्व ‘यथा माता तथा कन्या,’ ही म्हण तुझ्याविषयी म्हणतील.
45आपल्या नवर्‍याचा व मुलांचा धिक्कार करणारी तुझी माता तिची तू कन्या; आपल्या नवर्‍याचा व मुलांचा धिक्कार करणार्‍या तुझ्या बहिणी त्यांची तू बहीण; तुझी आई पडली हित्तीण व बाप पडला अमोरी.
46तुझ्या डावीकडे आपल्या कन्यांसह राहणारी शोमरोन ती तुझी थोरली बहीण आणि तुझ्या उजवीकडे आपल्या कन्यांसह राहणारी सदोम ही तुझी धाकटी बहीण.
47तू त्यांच्या मार्गांनी व त्यांच्या अमंगळ कृत्यांप्रमाणे थोडीथोडकी चाललीस असे नाही, तर तू आपला सर्व आचार त्यांच्यापेक्षाही भ्रष्ट केलास.
48प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, तू व तुझ्या कन्यांनी जसे वर्तन केले तसे तुझी बहीण सदोम हिने व तिच्या कन्यांनी केले नाही.
49पाहा, तुझी बहीण सदोम हिचे पाप येणेप्रमाणे होते : गर्व, अन्नाची विपुलता व ऐषआराम ही तिला व तिच्या कन्यांना होती; दरिद्री व गरजवंत ह्यांना तिने हात दिला नाही.
50त्यांनी उन्मत्त होऊन माझ्यासमोर अमंगळ कृत्ये केली; ती पाहून मी तिचा निःपात केला.
51शोमरोनेने तर तुझ्याहून अर्धेसुद्धा पाप केले नाही. तू आपली अमंगळ कृत्ये त्यांच्याहून अधिक केलीस; तू केलेल्या अमंगळ कृत्यांच्या मानाने तुझ्या बहिणी निर्दोष ठरल्या.
52तू आपल्या बहिणीस आपल्याहून निर्दोष ठरवलेस ह्याची अप्रतिष्ठा तू भोग; तू त्यांच्याहून घोर पापे केल्यामुळे तुझ्या मानाने त्या अधिक निर्दोष मानल्या पाहिजेत; तुझ्या बहिणी अधिक नीतिमान आहेत हे तू दाखवलेस, म्हणून तू फजीत व लज्जित हो.
53मी सदोम व तिच्या कन्या ह्यांचा आणि शोमरोन व तिच्या कन्या ह्यांचा व त्यांच्यामध्ये तुझ्या धरून नेलेल्या लोकांचाही बंदिवास फिरवीन;
54म्हणजे तुला लज्जेचा काळिमा लागेल, ज्या तुझ्या सर्व कृत्यांनी त्यांच्या मनाला समाधान प्राप्त झाले त्यांविषयी तू लज्जित होशील.
55तुझ्या बहिणी, सदोम व तिच्या कन्या आपली पूर्वस्थिती पुन्हा पावतील; शोमरोन व तिच्या कन्या आपली पूर्वस्थिती पुन्हा पावतील; तू व तुझ्या कन्या आपली पूर्वस्थिती पुन्हा पावाल.
56तू आपल्या तोर्‍यात असता, तुझी बहीण सदोम हिचे नावदेखील तुझ्या तोंडी नव्हते;
57अरामी स्त्रिया व तिच्या आसपासचे सर्व आणि तुला तुच्छ मानणार्‍या पलिष्टी स्त्रिया ह्यांनी तुझी अप्रतिष्ठा केली, त्या वेळेस तुझी दुष्टता प्रकट झाली, तशी अद्याप प्रकट झाली नव्हती.
58तू आपल्या दुष्कर्मांचे व अमंगळ कृत्यांचे फळ भोगत आहेस, असे परमेश्वर म्हणतो.
59प्रभू परमेश्वर म्हणतो, तू स्वतः वाहिलेल्या शपथेस तुच्छ मानून आपला करार मोडलास; तू जसे केलेस तसे मी तुझे करीन.
60तरी मी तुझ्या तारुण्यात तुझ्याबरोबर केलेला करार स्मरून तुझ्याबरोबर सर्वकाळचा करार करीन.
61तू आपल्या वडील बहिणी व आपल्या धाकट्या बहिणी ह्यांचा अंगीकार करशील तेव्हा तू आपले आचरण स्मरून लज्जित होशील, आणि त्या तुझ्याबरोबर केलेल्या करारातल्या नसल्या तरी त्या कन्या म्हणून देईन.
62मी तुझ्याबरोबर आपला करार स्थापित करीन तेव्हा तुला समजेल की, मी परमेश्वर आहे.
63तू जे सर्व केलेस त्याची मी क्षमा करीन, म्हणजे मग तुला त्याचे स्मरण होऊन तू लज्जा पावशील आणि अप्रतिष्ठेमुळे तू पुन्हा आपले तोंड उघडणार नाहीस, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”

सध्या निवडलेले:

यहेज्केल 16: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन