YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 13

13
खोट्या संदेष्ट्यांचा निषेध
1परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
2“मानवपुत्रा, संदेश देणार्‍या इस्राएलाच्या संदेष्ट्यांविरुद्ध संदेश दे; जे आपल्या मनचाच संदेश देतात त्यांना सांग, ‘परमेश्वराचे वचन ऐका!’
3प्रभू परमेश्वर म्हणतो, जे मूर्ख संदेष्टे दृष्टान्त पाहिल्यावाचून आपल्याच मनातील संदेश देतात ते हायहाय करोत.
4हे इस्राएला, तुझे संदेष्टे ओसाड जागी असलेल्या कोल्ह्यांसारखे झाले आहेत.
5परमेश्वराच्या दिवशी युद्धाला तोंड देण्यास तुम्ही खिंडारात उभे राहत नाही आणि इस्राएल घराण्याचा तट तुम्ही नीट बांधून काढत नाही.
6परमेश्वराने त्यांना पाठवले नसता, ही परमेश्वराची वाणी असे म्हणणारे पोकळ दृष्टान्त व खोटा शकुन पाहतात; आणि शकुनाप्रमाणे खरोखर घडेल अशी आशा धरतात.
7तुम्ही निरर्थक दृष्टान्त पाहिला, खोटा शकुन सांगितला आणि मी बोललो नसता, हे ‘परमेश्वराचे वचन’ असे तुम्ही म्हणाला की नाही?
8ह्याकरता प्रभू परमेश्वर म्हणतो, “तुम्ही पोकळ गोष्टी सांगता व खोटे दृष्टान्त पाहता; तर पाहा, मी तुमचा विरोध करीन असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
9निरर्थक दृष्टान्त पाहणार्‍या व खोटे शकुन सांगणार्‍या संदेष्ट्यांवर माझा हात चालेल; माझ्या लोकांच्या मंडळात त्यांचा प्रवेश होणार नाही, इस्राएल घराण्याच्या नामावलीत त्यांची नोंद व्हायची नाही; इस्राएल देशात त्यांचे जाणे होणार नाही; तेव्हा तुम्हांला समजेल की मी प्रभू परमेश्वर आहे.
10ह्याचे कारण हेच की त्यांनी माझ्या लोकांना बहकवले आहे, शांती नसता ‘शांती आहे’ असे त्यांनी म्हटले आहे आणि माझे लोक तट बांधत असता, पाहा, त्याला ते कच्चा चुना लिंपीत आहेत.
11त्या कच्चा चुना लिंपणार्‍यांना म्हण, तट पडेल! जोराचा पाऊस लागेल; अहो मोठ्या गारांनो, तुम्ही पडाल; तुफानी वारा सुटेल;
12पाहा, तो तट पडल्यावर ‘तुम्ही लिंपलेला चुना कोठे आहे,’ असे लोक तुम्हांला म्हणणार नाहीत काय?
13ह्याकरता प्रभू परमेश्वर म्हणतो : आपल्या संतापामुळे तुफानी वारा सुटेल असे मी करीन; माझ्या कोपामुळे जोराचा पाऊस पडेल, नाश होण्यासाठी माझ्या संतापामुळे मोठ्या गारा पडतील.
14तुम्ही कच्चा चुना लिंपलेला तट मी पाडून जमीनदोस्त करीन, म्हणजे त्याचा पाया उघडा पडेल; तट पडेल व तुम्ही त्याच्याबरोबर नष्ट व्हाल; तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.
15मी आपला संतापाचा कहर त्या तटावर व त्याला कच्चा चुना लिंपणार्‍यांवर गुदरवीन; तेव्हा मी तुम्हांला म्हणेन, तट व त्याचा कच्चा चुना लिंपणारे नष्ट झाले आहेत.
16ज्या संदेष्ट्यांनी यरुशलेमेविषयी संदेश दिला व शांती नसता शांती आहे असा दृष्टान्त सांगितला ते तुम्ही नष्ट झाला आहात, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
17आणखी हे मानवपुत्रा, आपल्याच मनातील संदेश देणार्‍या तुझ्या लोकांच्या कन्यांकडे तोंड करून त्यांच्याविरुद्ध संदेश दे.
18त्यांना सांग : प्रभू परमेश्वर म्हणतो, लोकांच्या प्राणांची पारध करावी म्हणून ज्या तुम्ही प्रत्येक कोपराला पट्ट्या शिवून लावता, व निरनिराळ्या उंचीच्या मनुष्यांच्या डोक्यांसाठी जाळ्या तयार करता, त्या तुम्ही हायहाय म्हणाल. तुम्ही माझ्या लोकांच्या प्राणांची पारध करता, पण स्वतःच्या प्राणांचा बचाव करता.
19लबाडीस कान देणार्‍या माझ्या लोकांना तुम्ही लबाडी सांगून, जे मरू नयेत त्यांना मारून व जे जगू नयेत त्यांना वाचवून मूठभर जवासाठी व भाकरीच्या तुकड्यासाठी तुम्ही माझ्या लोकांसमोर माझा अवमान केला आहे.
20ह्याकरता प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, ज्या पट्ट्या बांधून तुम्ही पक्ष्यांप्रमाणे पारध करता, त्यांची मी वाट लावीन; मी तुमच्या बाहूंवरून त्या पट्ट्या फाडून काढीन आणि ज्या आत्म्यांची तुम्ही पक्ष्यांप्रमाणे पारध करता, त्यांना मुक्त करीन.
21तुमच्या जाळ्याही मी फाडून टाकीन, तुमच्या हातातले माझे लोक मी सोडवीन; ते तुमच्या हाती ह्यापुढे भक्ष्य होणार नाहीत; तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.
22कारण ज्या नीतिमानास मी दुखवले नाही त्याचे मन तुम्ही खोटे बोलून दुखवता, आणि दुष्टाने आपल्या कुमार्गापासून वळू नये, आपला जीव वाचू नये असे तुम्ही त्याच्या हाताला बळ देता;
23म्हणून ह्यापुढे तुमचे निरर्थक दृष्टान्त पाहणे व तुमचे शकुन पाहणे बंद होईल; आणि मी आपले लोक तुमच्या हातांतून सोडवीन; तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.”

सध्या निवडलेले:

यहेज्केल 13: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन