यहेज्केल 11
11
दुष्ट लोकनायकांची कानउघाडणी
1मग आत्म्याने मला उचलून घेऊन परमेश्वराच्या मंदिराच्या पूर्वाभिमुख पूर्वेकडील द्वाराकडे आणले; तेव्हा पाहा, वेशीपुढे पंचवीस इसम होते; त्यांच्यामध्ये याजन्या बिन अज्जूर व पलट्या बिन बनाया हे लोकनायक माझ्या दृष्टीस पडले.
2तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, अधर्माची योजना करणारे व ह्या नगरात अनिष्ट संकल्प करणारे पुरुष ते हेच;
3ते म्हणतात, ‘घरे बांधण्याची वेळ अद्यापि जवळ आली नाही; हे नगर जणू काय कढई व आम्ही त्यातले मांस.’
4म्हणून त्यांच्याविरुद्ध संदेश दे, मानवपुत्रा, संदेश दे.”
5तेव्हा परमेश्वराचा आत्मा माझ्यावर उतरला; तो म्हणाला, “असे म्हण : परमेश्वर म्हणतो, अहो इस्राएल वंशजहो, तुम्ही असे असे म्हटले; तुमच्या मनात काय काय येत आहे ते मी जाणतो.
6तुम्ही ह्या नगरात अनेकांना वधले, त्यातले रस्ते प्रेतांनी भरून टाकले.
7ह्याकरता प्रभू परमेश्वर म्हणतो, तुम्ही ह्या नगरात ज्यांना वधून टाकले, ते मांस आहेत, व हे नगर कढई आहे; तुम्हांला तर त्यातून बाहेर नेतील.
8तुम्ही तलवारीस भिता; मी तुमच्यावर तलवार आणणार असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
9मी तुम्हांला त्यातून बाहेर काढीन, तुम्हांला परदेशीयांच्या हाती देईन व तुम्हांला न्यायदंड करीन.
10तुम्ही तलवारीने पडाल; इस्राएलसीमेवर मी तुमचा न्याय करीन तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.
11हे नगर तुम्हांला कढई होणार नाही व तुम्ही त्यातले मांसही होणार नाही; इस्राएलसीमेवर मी तुमचा न्याय करीन.
12तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे; कारण तुम्ही माझ्या नियमांप्रमाणे चालला नाहीत, माझे निर्णय तुम्ही पाळले नाहीत, तर तुम्ही आपल्यासभोवती असणार्या राष्ट्रांच्या निर्णयांप्रमाणे वागलात.”
13मी हा संदेश देत असता असे झाले की पलट्या बिन बनाया मेला; तेव्हा मी उपडा पडून मोठ्याने ओरडून म्हणालो, “अहा प्रभू परमेश्वरा, तू इस्राएली अवशेषाचा पुरा अंत करतोस काय?”
पुनरुज्जीवन व नवीकरण करण्याचे अभिवचन
14परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
15“मानवपुत्रा, जे यरुशलेमनिवासी, ‘परमेश्वरापासून दूर राहा, आम्हांलाच देश वतन मिळाला आहे,’ असे म्हणतात ते तुझे भाऊबंद, तुझे भाऊबंदच, तुझे आप्तजन, इस्राएलाचे सबंध घराणे आहेत;
16ह्याकरता असे म्हण, ‘प्रभू परमेश्वर म्हणतो की, मी त्यांना राष्ट्रांत दूर घालवून देऊन देशोदेशी पांगवले आहे, तरी ज्या ज्या देशात ते गेले त्यांत मी त्यांना अल्पकाळ पवित्रस्थान होईन.’
17ह्यास्तव असे म्हण : ‘प्रभू परमेश्वर म्हणतो की, मी तुम्हांला राष्ट्रांतून गोळा करून आणीन; ज्या ज्या देशांत तुम्ही पांगला आहात त्यांतून मी तुम्हांला गोळा करून घेईन, आणि इस्राएल देश तुम्हांला देईन.’
18ते येथे येतील आणि येथल्या सर्व तिरस्करणीय व अमंगळ वस्तू येथून काढून टाकतील.
19मी त्यांना एकच हृदय देईन; तुमच्यात नवीन आत्मा घालीन; मी त्यांच्या देहांतून पाषाणहृदय काढून टाकून त्यांना मांसमय हृदय देईन;
20म्हणजे ते माझ्या नियमांना अनुसरून चालतील; माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे वागतील; ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन.
21तरी ज्यांचे मन त्यांच्या तिरस्करणीय व अमंगळ वस्तूंच्या मनोरथास अनुसरते त्याच्या आचाराचे प्रतिफळ त्यांच्याच शिरी येईलसे मी करीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”
22तेव्हा करूबांनी आपले पंख उचलले, त्यांच्याबरोबर चाकेही उचलली गेली आणि इस्राएलाच्या देवाचे तेज त्यांच्यावर होते.
23मग परमेश्वराचे तेज नगराच्या मध्यभागाहून वर चढून नगराच्या पूर्वेस असलेल्या पर्वतावर राहिले.
24तेव्हा त्या आत्म्याने दृष्टान्तात मला उचलून घेऊन खास्दी देशात धरून आणलेल्या लोकांकडे आणले आणि जो दृष्टान्त मी पाहत होतो तो माझ्या डोळ्यांआड झाला.
25मग परमेश्वराने मला सांगितलेली सर्व वचने, धरून आणलेल्या त्या लोकांना मी सांगितली.
सध्या निवडलेले:
यहेज्केल 11: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.