मग परमेश्वराने मोशेला म्हटले, “अहरोनाला सांग की, ‘आपली काठी उगारून जमिनीच्या धुळीवर मार म्हणजे मिसर देशभर त्या धुळीच्या उवा बनतील.”’ त्यांनी तसे केले; अहरोनाने आपल्या हातातली काठी उगारून जमिनीच्या धुळीवर मारली तेव्हा मनुष्यांवर आणि पशूंवर उवा झाल्या; सर्व मिसर देशभर जमिनीवरल्या धुळीच्या उवाच उवा बनल्या. उवा उत्पन्न करण्यासाठी जादुगारांनी आपल्या मंत्रतंत्रांच्या योगे तसे करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते साधेना; मनुष्य व पशू उवांनी भरून गेले. तेव्हा जादुगार फारोला म्हणाले, “ह्यात देवाचा हात आहे.” तरी फारोचे मन कठीण राहिले आणि परमेश्वराने म्हटले होते त्याप्रमाणे तो त्यांचे ऐकेना. नंतर परमेश्वराने मोशेला सांगितले की, “पहाटेस ऊठ आणि जाऊन फारोपुढे उभा राहा; तो त्या वेळी नदीवर येईल; तू त्याला सांग, ‘परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून तू त्यांना जाऊ दे.’ माझ्या लोकांना जाऊ देणार नाहीस तर पाहा, तुझ्यावर, तुझ्या सेवकांवर, तुझ्या प्रजेवर, आणि तुझ्या घरात मी गोमाश्यांचे थवे पाठवीन; मिसरी लोकांची घरे व ते राहतात ती सर्व भूमी गोमाश्यांच्या थव्यांनी व्यापून जाईल. तथापि गोशेन प्रांतात माझे लोक राहत आहेत, तो मी त्या दिवशी अलग ठेवीन; गोमाश्यांचे थवे तेथे जाणार नाहीत, ह्यावरून पृथ्वीवर मी परमेश्वर आहे हे तुला कळेल. माझ्या प्रजेमध्ये व तुझ्या प्रजेमध्ये मी भेद राखीन; उद्यापर्यंत हे चिन्ह घडेल.”’ त्याप्रमाणे परमेश्वराने केले; फारोच्या वाड्यात, त्याच्या सेवकांच्या घरांत आणि सगळ्या मिसर देशात गोमाश्यांचे थव्यांचे थवे आले; गोमाश्यांच्या ह्या थव्यांनी देशाची खराबी झाली. मग फारोने मोशे व अहरोन ह्यांना बोलावून आणून म्हटले, “तुम्ही जा, ह्याच देशात आपल्या देवाला यज्ञ करा.” मोशे म्हणाला, “असे करणे उचित नाही, कारण आम्ही जो यज्ञ आमचा देव परमेश्वर ह्याला करणार आहोत त्याची मिसरी लोकांना किळस येईल. मिसरी लोकांच्या दृष्टीने किळसवाणा यज्ञ आम्ही त्यांच्या डोळ्यांदेखत केल्यास ते आम्हांला दगडमार करायचे नाहीत काय? आम्ही रानात तीन दिवसांच्या वाटेवर जाऊ आणि परमेश्वर आमचा देव आम्हांला सांगेल त्याप्रमाणे त्याला यज्ञ करू.” फारो म्हणाला, “तुम्ही रानात जाऊन परमेश्वर तुमचा देव ह्याला यज्ञ करावा ह्यासाठी मी तुम्हांला जाऊ देतो; मात्र फार दूर जाऊ नका; माझ्यासाठी विनवणी करा.” मोशे म्हणाला, “पाहा, मी तुमच्यापासून जातो आणि परमेश्वराला विनंती करतो की, फारो, त्याचे सेवक आणि त्याची प्रजा ह्यांच्यावरील गोमाश्यांचे थवे उद्या निघून जावेत; मात्र परमेश्वराप्रीत्यर्थ यज्ञ करण्यास लोकांना जाऊ न देण्यासंबंधी फारोने पुनरपि वंचना करू नये.” मग मोशेने फारोसमोरून निघून जाऊन परमेश्वराची विनवणी केली. परमेश्वराने मोशेच्या विनंतीप्रमाणे केले; फारो, त्याचे सेवक आणि त्याची प्रजा ह्यांच्यावर आलेले गोमाश्यांचे थवे त्याने दूर केले; एकही गोमाशी राहिली नाही. तथापि फारोने ह्या खेपेसही आपले मन कठीण केले आणि लोकांना जाऊ दिले नाही.
निर्गम 8 वाचा
ऐका निर्गम 8
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: निर्गम 8:16-32
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ