YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 35:20-35

निर्गम 35:20-35 MARVBSI

मग इस्राएल लोकांची सर्व मंडळी मोशेपुढून निघून गेली. नंतर ज्यांच्या अंतःकरणात स्फूर्ती झाली व ज्या कोणाला मनापासून इच्छा झाली, त्याने दर्शनमंडपाच्या कामासाठी, त्यातील सगळ्या सेवेसाठी आणि पवित्र वस्त्रांसाठी परमेश्वराला अर्पण आणले. ज्यांना मनापासून इच्छा झाली ते सगळे स्त्रीपुरुष आले आणि त्यांनी नथी, कुंडले, मुद्रिका, कंकणे असे सोन्याचे सर्व प्रकारचे दागिने आणले. ह्या प्रकारे प्रत्येक मनुष्याने परमेश्वरासाठी सोन्याचे अर्पण आणले. ज्या ज्या पुरुषाजवळ निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत, तलम सणाचे कापड, बकर्‍यांचे केस, लाल रंगवलेली मेंढ्यांची कातडी व तहशांची कातडी होती त्याने ते ते आणले. चांदी व पितळ ह्यांचे अर्पण करणार्‍या प्रत्येकाने ती अर्पणे परमेश्वरासाठी आणली आणि ज्या कोणाकडे सेवेच्या कामासाठी उपयोगी पडणारे बाभळीचे लाकूड होते ते तो घेऊन आला. ज्या स्त्रिया सुबुद्ध ह्रदयाच्या होत्या त्या सर्वांनी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत कातले आणि ते कातलेले सूत व आपल्या हातांनी विणलेले तलम सणाचे कापड त्यांनी आणले; आणि ज्या स्त्रियांच्या अंत:करणात स्फूर्ती होऊन त्यांना बुद्धी झाली, त्या सर्वांनी बकर्‍यांचे केस कातले. सरदारांनी एफोद व ऊरपट ह्यांत जडवण्यासाठी गोमेदमणी व इतर रत्ने, आणि दिव्यासाठी व अभिषेकासाठी तेल व सुगंधी धूपासाठी मसाला आणला. जे करण्याविषयी परमेश्वराने मोशेच्या द्वारे आज्ञा दिली होती त्या सर्वांसाठी इस्राएल लोकांनी स्वेच्छेने परमेश्वराप्रीत्यर्थ अर्पणे आणली, ज्या ज्या स्त्रीपुरुषांच्या अंत:करणात स्फूर्ती झाली त्यांनी त्यांनी ही अर्पणे आणली. मग मोशे इस्राएल लोकांना म्हणाला, “पाहा, यहूदा वंशातील ऊरीचा मुलगा म्हणजे हूराचा नातू बसालेल ह्याला परमेश्वराने नाव घेऊन बोलावले आहे; आणि त्याने त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून अक्कल, बुद्धी, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे; तो कलाकुसरीची कामे करील; सोने, रुपे व पितळ ह्यांची कामे करील; जडवण्यासाठी रत्नांना पैलू पाडील; लाकडाचे नक्षीकाम करील आणि अशा सर्व प्रकारची कारागिरीची कामे करील. परमेश्वराने त्याच्या ठायी आणि दान वंशातील अहिसामाकाचा मुलगा अहलियाब ह्याच्या ठायी शिक्षण देण्याचे सामर्थ्य ठेवले आहे. कोरीव काम करणारे कुशल कारागीर, निळ्या, जांभळ्या, किरमिजी रंगाच्या व सुताच्या कापडावर व तलम सणाच्या कापडावर कशिदा काढणारे, विणकाम करणारे, सर्व तर्‍हेचे कसबी काम करणारे, कुशल कामाची योजना करणारे अशासारख्यांची सर्व कारागिरीची कामे करण्यासाठी त्याने ह्या दोघांचे मन ज्ञानाने परिपूर्ण केले आहे.