मोशे परमेश्वराला म्हणाला, “पाहा, तू मला म्हणतोस की, ‘ह्या लोकांना घेऊन जा’; पण तू माझ्याबरोबर कोणाला पाठवणार हे मला अजून कळवले नाहीस. तरी तू म्हटले आहेस की, ‘मी तुला व्यक्तिश: नावाने ओळखतो, आणि तुझ्यावर माझी कृपादृष्टी आहे.’ आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास, तुझे मार्ग मला दाखव, म्हणजे मला तुझी ओळख पटेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टी माझ्यावर होईल. हे राष्ट्र तुझी प्रजा आहे हे लक्षात घे.” परमेश्वर म्हणाला, “मी स्वत: येईन आणि तुला विसावा देईन.” तो त्याला म्हणाला, “तू स्वत: येत नसलास तर आम्हांला येथून पुढे नेऊ नकोस. तुझी कृपादृष्टी माझ्यावर व तुझ्या प्रजेवर झाली आहे हे कशावरून समजावे? तू आमच्याबरोबर आल्याने मी व तुझे प्रजाजन पृथ्वीवरील इतर सर्व लोकांपेक्षा वेगळे झालो आहोत ह्यावरूनच ते समजायचे ना?” मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “हे जे तू सांगितले आहेस तेही मी करीन; कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे आणि मी तुला व्यक्तिश: नावाने ओळखत आहे.” तो म्हणाला, “कृपा करून मला तुझे तेज दाखव.” तो म्हणाला, “मी आपले सर्व चांगुलपण तुझ्यापुढे चालवीन; तुझ्यासमोर ‘परमेश्वर’ ह्या नावाची मी घोषणा करीन; ज्याच्यावर कृपा करावी असे वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन आणि ज्याच्यावर दया करावी असे वाटेल त्याच्यावर दया करीन. तरीपण” तो म्हणाला की, “तुला माझे मुख पाहवणार नाही, कारण माझे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही.” परमेश्वर म्हणाला, “माझ्याकडे एक जागा आहे; येथे ह्या खडकावर उभा राहा; असे होईल की, माझे तेज जवळून चालले असता मी तुला खडकाच्या भेगेत ठेवीन; मी निघून जाईपर्यंत आपल्या हाताने तुला झाकीन; मग मी आपला हात काढून घेईन आणि तुला पाठमोरा दिसेन; पण माझे मुख दिसायचे नाही.”
निर्गम 33 वाचा
ऐका निर्गम 33
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: निर्गम 33:12-23
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ