YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 3:13-22

निर्गम 3:13-22 MARVBSI

तेव्हा मोशे देवाला म्हणाला, “पाहा, ‘मला तुमच्या पूर्वजांच्या देवाने तुमच्याकडे पाठवले आहे,’ असे मी इस्राएलवंशजांकडे जाऊन त्यांना सांगितले असता ‘त्याचे नाव काय’ असे मला ते विचारतील, तेव्हा मी त्यांना काय सांगू?” देव मोशेला म्हणाला, “मी आहे तो आहे; तू इस्राएलवंशजांस सांग, ‘मी आहे’ ह्याने मला तुमच्याकडे पाठवले आहे.” आणखी देवाने मोशेला सांगितले, “तू इस्राएल लोकांना सांग, तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर ह्याने मला तुमच्याकडे पाठवले आहे; हेच माझे सनातन नाव आहे व ह्याच नावाने पिढ्यानपिढ्या माझे स्मरण होईल. तू जा आणि इस्राएलाच्या वडील जनांस जमवून सांग; तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा, इसहाकाचा व याकोबाचा देव परमेश्वर ह्याने मला दर्शन देऊन म्हटले की, माझे तुमच्यावर खरोखर लक्ष गेले आहे व मिसर देशात तुमचे काय होत आहे हे मला कळले आहे; मिसर देशातल्या विपत्तीतून सोडवून कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्यांच्या देशात जेथे दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत त्या देशात, तुम्हांला घेऊन जाईन असे मी सांगितले आहे म्हणून कळव. तुझे सांगणे ते ऐकतील; मग तू आणि इस्राएलाचे वडील जन मिसर देशाच्या राजाकडे जा व त्याला सांगा, इब्र्यांचा देव परमेश्वर आम्हांला भेटला आहे; तर आमचा देव परमेश्वर ह्याला यज्ञ करावा, म्हणून आम्हांला तीन दिवसांच्या वाटेवर रानात जाऊ द्यावे; पण मला ठाऊक आहे की, मिसर देशाचा राजा तुम्हांला जाऊ देणार नाही; त्याला भुजप्रताप दाखवल्या-शिवाय तो जाऊ देणार नाही. मग मी आपला हात पुढे करून मिसर देशात ज्या सर्व अद्भुत कृती करणार त्यांचा मारा मी त्याच्यावर करीन; मग तो तुम्हांला जाऊ देईल; आणि ह्या लोकांवर मिसरी लोकांची कृपादृष्टी होईल असे मी करीन; म्हणून तुम्ही निघाल तेव्हा रिकाम्या हाताने निघणार नाही; तर तुमची प्रत्येक स्त्री आपल्या शेजारणीपासून व आपल्या घरात बिर्‍हाड करून राहणार्‍या स्त्रीपासून सोन्या-रुप्याचे अलंकार व पोशाख मागून घेईल; ते तुम्ही आपल्या मुलामुलींना घालाल; ह्या प्रकारे तुम्ही मिसरी लोकांना लुटाल.”