YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 3:1-16

निर्गम 3:1-16 MARVBSI

मोशे आपला सासरा मिद्यानी याजक इथ्रो ह्याची शेरडेमेंढरे चारत होता आणि तो आपला कळप रानाच्या पिछाडीस देवाचा डोंगर होरेब येथवर घेऊन गेला. तेव्हा परमेश्वराच्या दूताने एका झुडपातून अग्निज्वालेत त्याला दर्शन दिले; त्याने दृष्टी लावली तर झुडूप अग्नीने जळत असून ते भस्म झाले नाही असे त्याला दिसले. तेव्हा मोशे म्हणाला, “मी आता तिकडे जाऊन हा काय चमत्कार आहे, ते झुडूप का भस्म होत नाही ते पाहतो.” ते पाहण्यास मोशे तिकडे वळला असे परमेश्वराने पाहिले, आणि झुडपातून देवाने त्याला हाक मारून म्हटले, “मोशे, मोशे.” तेव्हा तो म्हणाला, “काय आज्ञा?” देव त्याला म्हणाला, “इकडे जवळ येऊ नकोस; तू आपल्या पायांतले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे.” तो आणखी म्हणाला, “मी तुझ्या पित्याचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव, याकोबाचा देव आहे.” तेव्हा मोशेने आपले तोंड झाकले; कारण देवाकडे पाहण्यास तो भ्याला. परमेश्वर म्हणाला, “मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे, त्यांच्या मुकादमांच्या जाचामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे; त्यांचे क्लेश मी जाणून आहे; त्यांना मिसरी लोकांच्या हातातून सोडवावे, आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात, दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहेत अशा देशात, म्हणजे कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्यांच्या देशात त्यांना घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे. पाहा, इस्राएलवंशजांचा आक्रोश माझ्यापर्यंत आला आहे; मिसरी लोक त्यांच्यावर कसा जाचजुलूम करीत आहेत हेही मी प्रत्यक्ष पाहिले आहे. तर आता चल, तू मिसर देशातून माझे लोक इस्राएलवंशज ह्यांना बाहेर काढावे म्हणून मी तुला फारोकडे पाठवतो.” तेव्हा मोशे देवाला म्हणाला, “फारोकडे जाऊन इस्राएलवंशजांना मिसरातून काढून आणणारा असा मी कोण?” देव म्हणाला, “खचीत मी तुझ्याबरोबर असेन; मी तुला पाठवले ह्याची खूण हीच : तू लोकांना मिसरातून काढून आणल्यावर ह्याच डोंगरावर तुम्ही देवाची सेवा कराल.” तेव्हा मोशे देवाला म्हणाला, “पाहा, ‘मला तुमच्या पूर्वजांच्या देवाने तुमच्याकडे पाठवले आहे,’ असे मी इस्राएलवंशजांकडे जाऊन त्यांना सांगितले असता ‘त्याचे नाव काय’ असे मला ते विचारतील, तेव्हा मी त्यांना काय सांगू?” देव मोशेला म्हणाला, “मी आहे तो आहे; तू इस्राएलवंशजांस सांग, ‘मी आहे’ ह्याने मला तुमच्याकडे पाठवले आहे.” आणखी देवाने मोशेला सांगितले, “तू इस्राएल लोकांना सांग, तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर ह्याने मला तुमच्याकडे पाठवले आहे; हेच माझे सनातन नाव आहे व ह्याच नावाने पिढ्यानपिढ्या माझे स्मरण होईल. तू जा आणि इस्राएलाच्या वडील जनांस जमवून सांग; तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा, इसहाकाचा व याकोबाचा देव परमेश्वर ह्याने मला दर्शन देऊन म्हटले की, माझे तुमच्यावर खरोखर लक्ष गेले आहे व मिसर देशात तुमचे काय होत आहे हे मला कळले आहे