YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 14:1-18

निर्गम 14:1-18 MARVBSI

परमेश्वराने मोशेला म्हटले, “इस्राएल लोकांना असे सांग की, तुम्ही मागे फिरून मिग्दोल आणि समुद्र ह्यांच्यामध्ये असलेल्या पी-हहिरोथापुढे बाल-सफोनासमोर तळ द्यावा; त्यासमोर समुद्राजवळ आपले डेरे उभारावेत. मग फारो इस्राएल लोकांसंबंधाने म्हणेल की, ‘ते देशात गोंधळले आहेत; त्यांचा रानात कोंडमारा झाला आहे.’ मी फारोचे मन कठीण करीन आणि तो त्यांचा पाठलाग करील; ह्या प्रकारे फारो व त्याची सर्व सेना ह्यांच्या पराभवाकडून मला गौरव मिळेल, आणि मी परमेश्वर आहे हे मिसरी लोक ओळखतील.” मग त्याप्रमाणे त्यांनी केले. इस्राएल लोक पळून गेले आहेत हे वर्तमान मिसराच्या राजाला कळले तेव्हा फारोचे व त्याच्या सेवकांचे मन त्या लोकांसंबंधाने बदलले, आणि ते म्हणू लागले की, “इस्राएल लोकांना आपल्या गुलामगिरीतून सुटून जाऊ दिले हे आम्ही काय केले?” तेव्हा त्याने आपला रथ तयार करून आपले लोक आपल्याबरोबर घेतले. त्याने सहाशे निवडक रथ व मिसरातले सर्व रथ त्यांवरील सरदारांसह बरोबर घेतले. परमेश्वराने मिसराचा राजा फारो ह्याचे मन कठीण केले आणि तो इस्राएल लोकांच्या पाठीस लागला; इस्राएल लोक तर मोठ्या धैर्याने चालले होते. मग फारोचे सर्व घोडे, रथ व स्वार ह्यांसह मिसरी सैन्याने त्यांचा पाठलाग करून पी-हहिरोथानजीक व बाल-सफोना-समोर समुद्रतीरी त्यांनी तळ दिला होता तेथे त्यांना गाठले. फारो नजीक येऊन ठेपला; इस्राएल लोकांनी टेहळणी करून पाहिले तर मिसरी लोक आपल्या पाठोपाठ येत आहेत असे त्यांना दिसले; तेव्हा त्यांना फार भीती वाटली. ते परमेश्वराचा धावा करू लागले. ते मोशेला म्हणाले, “मिसरात काय कबरा नव्हत्या म्हणून तू आम्हांला येथे रानात मरायला आणले? आम्हांला तू मिसरातून बाहेर आणले ते काय म्हणून? आम्ही तुला मिसरात नव्हतो का म्हणत की आम्ही आहोत ते ठीक आहोत. आम्हांला मिसरी लोकांची गुलामगिरी करीत राहू दे? येथे रानात मरून जावे त्यापेक्षा मिसरी लोकांच्या गुलामगिरीत राहणे परवडले असते.” मोशे लोकांना म्हणाला, “भिऊ नका. स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पाहा, कारण ज्या मिसरी लोकांना तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडणार नाहीत. परमेश्वर तुमच्यासाठी लढेल; तुम्ही शांत राहा.” मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “माझा धावा करीत काय बसलास? इस्राएल लोकांना सांग की, पुढे चला. तू आपली काठी उचलून आपला हात समुद्रावर उगार व त्याचे दोन भाग कर म्हणजे इस्राएल लोक भर समुद्रातून कोरड्या भूमीवर चालतील; आणि पाहा, मी स्वतः मिसर्‍यांची मने कठीण करीन. ते त्यांच्या पाठीस लागतील; आणि फारो, त्याची सर्व सेना, त्याचे रथ व त्याचे स्वार ह्यांच्याकडून मी आपला सन्मान पावेन. फारो, त्याचे रथ व त्याचे स्वार ह्यांच्या (पराभवा) कडून माझे गौरव झाल्याने मी परमेश्वर आहे हे मिसरी लोक ओळखतील.”