मग इस्राएल लोक रामसेस येथून कूच करून सुक्कोथ येथे गेले; जे पुरुष पायी गेले ते मुलाबाळांशिवाय सुमारे सहा लाख होते. त्यांच्याबरोबर एक मिश्र समुदायसुद्धा गेला; तशीच शेरडेमेंढरे, गुरेढोरे वगैरे पुष्कळ जनावरे गेली. त्यांनी आपल्याबरोबर मिसर देशातून मळलेली कणीक आणली होती, तिच्या बेखमीर भाकरी भाजल्या, तिच्यात काही खमीर नव्हते; मिसर देशातून त्यांना जबरीने बाहेर काढले होते, म्हणून त्यांना थांबायला अवकाश मिळाला नाही; त्यांना खाण्यासाठी काही तयार करून घेता आले नाही. इस्राएल लोकांना मिसर देशात राहून चारशे तीस वर्षे लोटली होती. चारशे तीस वर्षे संपली त्याच दिवशी परमेश्वराच्या सर्व सेना मिसर देशातून निघाल्या. परमेश्वराने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले ह्याकरता परमेश्वराप्रीत्यर्थ ही जागरणाची रात्र आहे; इस्राएल लोकांसाठी पिढ्यानपिढ्या परमेश्वराप्रीत्यर्थ ही जागरणाची रात्र आहे म्हणून अवश्य पाळावी. परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला, “वल्हांडण सणाचा विधी असा : परदेशीयांपैकी कोणी त्यातले काही खाऊ नये; तथापि पैसे देऊन विकत घेतलेला प्रत्येक दास सुंता झाल्यावर त्यातले खाऊ शकेल. उपरे अथवा मोलकरी ह्यांपैकी कोणी ते खाऊ नये. हे भोजन एकाच घरात झाले पाहिजे; त्या मांसातील काहीएक घराच्या बाहेर नेऊ नये आणि यज्ञपशूचे एकही हाड तोडू नये. इस्राएलाच्या सार्या मंडळीने हा विधी पाळावा. तुमच्याबरोबर राहणारा कोणी परदेशीय परमेश्वरासाठी वल्हांडण सण पाळणार असेल, तर त्याच्या घरच्या सर्व पुरुषांची सुंता व्हावी; मग त्याला जवळ येऊ देऊन सण पाळू द्यावा आणि देशी मनुष्याप्रमाणे त्याला गणावे; पण कोणा बेसुनत पुरुषाने त्यातले काही खाऊ नये. स्वदेशीय व तुमच्यामध्ये राहणारा उपरा ह्या दोघांना एकच नियम असावा.” ह्या प्रकारे सर्व इस्राएल लोकांनी केले; परमेश्वराने मोशे व अहरोन ह्यांना आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी केले. त्याच दिवशी परमेश्वराने इस्राएल लोकांना टोळीटोळीने मिसर देशातून बाहेर आणले.
निर्गम 12 वाचा
ऐका निर्गम 12
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: निर्गम 12:37-51
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ