YouVersion लोगो
सर्च आयकॉन

एस्तेर 4

4
आपल्या लोकांसाठी रदबदली करण्याचे एस्तेरचे अभिवचन
1हे वर्तमान मर्दखयाच्या कानी पडले तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली, गोणपाट नेसून राख फासली आणि नगराच्या मध्यभागी जाऊन मोठ्याने आक्रंदन केले;
2तो राजमंदिराच्या दरवाजासमोरही गेला; गोणपाट नेसून राजमंदिराच्या दरवाजाच्या आत येण्याची कोणास परवानगी नसे.
3राजाचा हुकूम व फर्मान ज्या ज्या प्रांतात जाऊन पोहचले तेथे तेथे यहूदी लोकांत मोठा विलाप, उपोषण व रडारड चालू झाली; बहुतेक लोक गोणपाट नेसून राखेत पडून राहिले.
4एस्तेरच्या दासी व खोजे ह्यांनी हे वर्तमान तिला जाऊन सांगितले; तेव्हा राणीला फार खेद झाला; मर्दखयाने गोणपाट काढून वस्त्र ल्यावे म्हणून तिने ते त्याच्याकडे पाठवले, पण तो ते घेईना.
5राजाने एस्तेरच्या तैनातीस ठेवलेल्या खोजांपैकी हथाक ह्याला तिने बोलावून आणून सांगितले की, मर्दखयाकडे जाऊन हे काय व असे का ह्याची चौकशी कर.
6हथाक निघून राजमंदिराच्या दरवाजासमोरील नगराच्या चौकात मर्दखयाकडे गेला.
7आपल्यावर काय प्रसंग गुदरला आहे आणि यहूदी लोकांचा वध व्हावा म्हणून हामानाने राजभांडारात किती पैसे भरले आहेत ही सर्व हकिकत मर्दखयाने त्याला सांगितली.
8यहूदी लोकांचा विध्वंस करण्याविषयीची जी आज्ञा शूशन येथे दिली होती त्या लेखाची नक्कलही एस्तेरला दाखवण्यासाठी त्याच्या हाती त्याने दिली आणि हे सर्व कळवून त्याने तिला असे बजावण्यास सांगितले की, तू राजाकडे जाऊन आपल्या लोकांसाठी विनंती व काकळूत करावीस.
9हथाकाने येऊन मर्दखयाचे म्हणणे एस्तेरला सांगितले.
10तेव्हा एस्तेरने हथाकाबरोबर मर्दखयास सांगून पाठवले की,
11“राजाचे सर्व सेवक व राजाच्या सर्व परगण्यांतील लोक जाणून आहेत की कोणी पुरुष अगर स्त्री बोलावल्यावाचून आतल्या चौकात राजाकडे गेली तर त्याला अथवा तिला प्राणदंड करावा असा सक्त हुकूम आहे; मात्र राजा आपला सोन्याचा राजदंड ज्याच्यापुढे करील त्याचाच बचाव होणार; मला तर आज तीस दिवस राजाकडून बोलावणे आले नाही.”
12एस्तेरचे हे म्हणणे मर्दखयास कळवण्यात आले.
13तेव्हा त्याने त्याच्या हस्ते एस्तेरला सांगून पाठवले की, “तू राजमंदिरात आहेस म्हणून तू यहूदी लोकांतून वाचून राहशील असे तुझ्या मनास वाटू देऊ नकोस.
14तू ह्या प्रसंगी गप्प राहिलीस तरी दुसर्‍या कोठूनही यहूद्यांची सुटका व उद्धार होईलच. पण मग तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. तुला ह्या असल्याच प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल कशावरून?”
15मग एस्तेरने मर्दखयास उलट निरोप पाठवला की,
16“जा, शूशन येथले सर्व यहूदी जमवा; माझ्याकरता उपास करा; तीन दिवस व तीन रात्री अन्नोदक सेवू नका; मीही आपल्या दासींसह तसाच उपास करीन; असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आत राजाकडे जाईन; मग मी मेले तर मेले.”
17मर्दखयाने जाऊन एस्तेरच्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही केले.

सध्या निवडलेले:

एस्तेर 4: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन