YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इफिसकरांस पत्र 2:1-10

इफिसकरांस पत्र 2:1-10 MARVBSI

तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यांमुळे मृत झालेले होता; त्या पातकांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात ह्या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणार्‍या लोकांत आता कार्य करणार्‍या आत्म्याचा अधिपती ह्याच्या धोरणाप्रमाणे चालत होता. त्या लोकांत आपणही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे करत होतो व स्वभावतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. तरी देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे, ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले, (कृपेने तुमचे तारण झालेले आहे); आणि ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्याचबरोबर उठवले व त्याच्याचबरोबर स्वर्गात2 बसवले; ह्यासाठी की, ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्या तुमच्या-आमच्यावरील ममतेच्या द्वारे येणार्‍या युगात त्याने आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे; कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. आपण सत्कृत्ये करावीत म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत; ती सत्कृत्ये आचरत आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली.