आता, अहो इस्राएल लोकहो, जे विधी व नियम मी तुम्हांला शिकवत आहे ते पाळावेत म्हणून तुम्ही ते ऐकून घ्या म्हणजे तुम्ही जिवंत राहाल आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर तुम्हांला जो देश देत आहे त्यात प्रवेश करून तो वतन करून घ्याल. जी आज्ञा मी तुम्हांला देत आहे तिच्यात काही अधिकउणे करू नका, अशासाठी की, तुमचा देव परमेश्वर ह्याच्या ज्या ज्या आज्ञा मी तुम्हांला देत आहे त्या तुम्ही पाळाव्यात. बआल-पौराच्या प्रकरणी परमेश्वराने काय केले ते तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे; जे लोक बआल-पौरांच्या नादी लागले त्या सर्वांना तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्यामधून नष्ट केले. पण जे तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याला चिकटून राहिलात ते सगळे आज जिवंत आहात. पाहा, ज्या देशाचे वतन मिळवायला तुम्ही जात आहात त्यात पाळण्यासाठी आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेप्रमाणे मी तुम्हांला विधी व नियम शिकवले आहेत त्याप्रमाणे तुम्ही चालावे. तुम्ही ते काळजीपूर्वक पाळावेत; कारण त्यामुळे देशोदेशीच्या लोकांच्या दृष्टीला तुम्ही सुज्ञ व समंजस असे दिसाल; त्या सर्व विधींसंबंधी ऐकून ते म्हणतील की, ‘हे महान राष्ट्र खरोखर बुद्धिमान व समंजस लोकांचे आहे.’ कारण आमचा देव परमेश्वर ह्याचा आम्ही धावा करतो तेव्हा तो आमच्याजवळ असतो. ह्याच्यासारखे देव जवळ असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे? हे सारे नियमशास्त्र मी आज तुम्हांला देत आहे. त्यातल्यासारखे यथार्थ विधी व नियम असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे? मात्र स्वतःविषयी सावधगिरी बाळग आणि स्वत:ला फार जप, नाहीतर तू ज्या गोष्टी डोळ्यांनी पाहिल्या आहेत त्या विसरून जाशील आणि जन्मभर त्या तुझ्या मनातून जातील; तू आपल्या पुत्रपौत्रांना त्यांची माहिती द्यावी; ज्या दिवशी तू होरेबाजवळ आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर उभा राहिलास त्या दिवशी परमेश्वर मला म्हणाला की, ‘ते इहलोकी असेपर्यंत त्यांनी माझे भय बाळगायला शिकावे व आपल्या मुलाबाळांनाही तसे शिकवावे म्हणून ह्या लोकांना माझ्याजवळ जमव म्हणजे मी आपली वचने त्यांना ऐकवीन.’ त्या दिवशी तुम्ही पुढे येऊन त्या पर्वताच्या पायथ्याशी उभे राहिलात, तेव्हा पर्वत पेटला होता आणि त्याच्या ज्वाला गगनमंडळ भेदून चालल्या होत्या आणि त्याच्यावर काळोख, मेघ व निबिड अंधकार पसरला होता. तेव्हा परमेश्वराने त्या अग्नीमधून तुमच्याशी भाषण केले; तुम्ही बोलण्याचा आवाज ऐकला पण काही आकृती पाहिली नाही; वाणी मात्र ऐकली. त्याने तुम्हांला आपला करार विदित करून तो पाळण्याची आज्ञा केली; हा करार म्हणजे त्या दहा आज्ञा होत; त्या त्याने दोन दगडी पाट्यांवर लिहिल्या. तुम्ही पैलतीरी जाऊन ज्या देशाचे वतन मिळवणार आहात त्यात तुम्ही त्या पाळाव्यात म्हणून परमेश्वराने त्या वेळेस तुम्हांला विधी व नियम शिकवण्याची मला आज्ञा केली. म्हणून तुम्ही अतिशय सावधगिरी बाळगा, कारण परमेश्वराने तुमच्याशी होरेब पर्वतावर अग्नीतून भाषण केले त्या दिवशी तुम्ही काही आकृती पाहिली नाही, ह्यासाठी की, तुम्ही बिघडून जाऊन एखाद्या पुरुषाची अथवा स्त्रीची, पृथ्वीवर संचार करणार्या एखाद्या पशूची किंवा अंतराळात उडणार्या एखाद्या पक्ष्याची, भूमीवर रांगणार्या एखाद्या जंतूची अथवा पृथ्वीखालच्या जलामध्ये राहणार्या एखाद्या माशाची प्रतिमा करू नये; अथवा आकाशाकडे नजर लावून सूर्य, चंद्र, तारे अर्थात आकाशातील तारांगण पाहून बहकून जाऊन त्यांना दंडवत घालू नये व त्यांची पूजा करू नये; हे तुमचा देव परमेश्वर ह्याने आकाशाखालील सर्व लोकांना देऊन ठेवले आहेत. तुम्ही आज आहात त्याप्रमाणे परमेश्वराची खास1 प्रजा व्हावे म्हणून त्याने तुम्हांला लोखंडी भट्टीतून, म्हणजे मिसर देशातून बाहेर काढले आहे. मग तुमच्यामुळे परमेश्वराने माझ्यावर रागावून अशी शपथ वाहिली की, तुला यार्देनेच्या पलीकडे जायचे नाही, व जो उत्तम देश इस्राएलाचा देव परमेश्वर त्यांना वतन म्हणून देत आहे त्यात तू प्रवेश करणार नाहीस; म्हणून मला ह्या देशात मरणे भाग आहे; मला यार्देनेच्या पलीकडे जायचे नाही; पण तुम्ही पार जाऊन तो उत्तम देश ताब्यात घ्या. तुम्ही स्वत:विषयी सावधगिरी बाळगा; नाहीतर तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्याशी केलेला करार विसरून तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला मनाई केलेल्या एखाद्या वस्तूच्या आकाराची कोरीव मूर्ती कराल. कारण तुझा देव परमेश्वर हा भस्म करणारा अग्नी आहे; तो ईर्ष्यावान देव आहे.
अनुवाद 4 वाचा
ऐका अनुवाद 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: अनुवाद 4:1-24
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ