“अहो आकाशांनो, लक्ष द्या मी बोलत आहे; पृथ्वी माझ्या तोंडचे शब्द ऐको.
पर्जन्याप्रमाणे माझ्या बोधाची वृष्टी होवो, माझे भाषण दहिवराप्रमाणे ठिबको; कोवळ्या गवतावर जशी पावसाची झिमझिम, हिरवळीवर जशा पावसाच्या सरी, तसे ते वर्षो.
मी परमेश्वराच्या नावाची घोषणा करीन; आमच्या देवाची महती वर्णा.
तो दुर्ग आहे; त्याची कृती परिपूर्ण आहे; त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत; तो विश्वसनीय देव आहे, त्याच्या ठायी अनीती नाही; तो न्यायी व सरळ आहे.
ते बिघडले आहेत, ते त्याचे पुत्र नव्हत, हा त्यांचा दोष आहे; ही विकृत व कुटिल पिढी आहे.
अहो मूढ व निर्बुद्ध लोकहो, तुम्ही परमेश्वराची अशी फेड करता काय? ज्याने तुला घडवले तोच तुझा पिता ना? त्यानेच तुला निर्माण केले व स्थापले.
पुरातन काळच्या दिवसांचे स्मरण कर, कैक पिढ्यांची वर्षे ध्यानात आण, आपल्या बापाला विचार, तो तुला निवेदन करील; आपल्या वडील जनांस विचार ते तुला सांगतील.
जेव्हा परात्पराने राष्ट्रांना त्यांची वतने दिली, जेव्हा त्याने मानवांस निरनिराळे वसवले, तेव्हा त्याने इस्राएल लोकांच्या संख्येप्रमाणे राष्ट्रांच्या सीमा आखून दिल्या;
कारण परमेश्वराचे लोक हाच त्याचा वाटा, याकोब हाच त्याचा वतनभाग.
तो त्याला वैराण प्रदेशात व घोंघावणार्या ओसाड रानात सापडला; त्याने त्याच्या सभोवती राहून त्याची निगा राखली, आपल्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे त्याला सांभाळले.
गरुड पक्षीण आपले कोटे हलवते, आपल्या पिलांवर तळपत असते, आपले1 पंख पसरून त्यांवर त्यांना घेते व आपल्या पंखांवर वाहते,
त्याप्रमाणे परमेश्वरानेच त्याला चालवले, त्याच्याबरोबर परका देव नव्हता.
त्याने त्याला पृथ्वीवरील उंच उंच स्थानांवरून मिरवत नेले, त्याने शेतात उपज खाल्ला; त्याने त्याला खडकातील मध, आणि गारेच्या खडकातील तेल चाटवले;
गाईचे दही, मेंढ्यांचे दूध, कोकरांची चरबी, बाशानाचे एडके व बकरे, उत्तम गव्हाचे सत्त्व, हे त्याला दिले; द्राक्षांची लालभडक मदिरा तू प्यालास.