अनुवाद 26
26
प्रथमउत्पन्न आणि दशांश सादर करण्याचे विधी
1तुझा देव परमेश्वर जो देश तुला वतन म्हणून देत आहे त्यात पोहचल्यावर तू त्याचा ताबा घेऊन त्यात वस्ती करशील, 2आणि तुझा देव परमेश्वर तुला जो देश देत आहे त्यातील जमिनीचे सर्व प्रकारचे प्रथमउत्पन्न तू घरी आणशील, तेव्हा त्यातले काही पाटीत घालून तुझा देव परमेश्वर ह्याने आपल्या नावाच्या निवासासाठी निवडलेल्या स्थानाकडे घेऊन जा.
3आणि त्या वेळी जो याजक असेल त्याच्याकडे जाऊन त्याला असे म्हण : ‘तुझा देव परमेश्वर ह्याच्यापुढे मी जाहीर करतो की, परमेश्वराने आम्हांला जो देश देण्याविषयी आमच्या पूर्वजांशी शपथ वाहिली होती त्यात मी आलो आहे.’
4मग याजकाने तुझ्या हातून ती पाटी घेऊन तुझा देव परमेश्वर ह्याच्या वेदीसमोर खाली ठेवावी.
5तेव्हा तू आपला देव परमेश्वर ह्याच्यासमक्ष असे म्हण : ‘माझा मूळ पुरुष मरता मरता वाचलेला1 एक अरामी होता; तो मिसर देशात गेला व तेथे आपल्या लहानशा परिवारासह उपरा म्हणून राहिला; त्याच्यापासून तेथे एक महान, पराक्रमी व दाट वस्तीचे राष्ट्र उत्पन्न झाले;
6तेथे मिसरी लोकांनी आम्हांला निर्दयतेने वागवले, गांजले व आम्हांला वेठीस लावले;
7पण आम्ही आमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याचा धावा केला तेव्हा त्याने आमची आरोळी ऐकली; आणि आमचे दु:ख, कष्ट व छळ पाहिला.
8तेव्हा परमेश्वराने पराक्रमी बाहूने व उगारलेल्या हाताने महाभयंकर उत्पात, चिन्हे व चमत्कार ह्यांच्या योगे आम्हांला मिसर देशातून बाहेर आणले;
9आणि आम्हांला ह्या स्थळी आणून पोहचवले व दुधामधाचे प्रवाह ज्यात वाहत आहेत असा हा देश आम्हांला दिला.
10आता, हे परमेश्वरा, जमिनीचे प्रथमउत्पन्न, तू मला दिले आहेस त्यातले काही मी तुला आणले आहे.’ मग तू आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर ती पाटी खाली ठेवून त्याला दंडवत घाल;
11आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला व तुझ्या घराण्याला जे जे चांगले दिले आहे त्या सर्वांबद्दल आनंद कर; तुझ्याबरोबरचा लेवी व तुझ्याबरोबरचा उपरा ह्यांनीही त्यांचा आनंदाने उपभोग घ्यावा.
12तिसर्या वर्षी, म्हणजे दशमांश वेगळा काढण्याच्या वर्षी, जेव्हा तू आपल्या उत्पन्नाचा सबंध दशमांश वेगळा काढण्याचे संपवशील तेव्हा तो तू लेव्याला, उपर्याला, अनाथाला व विधवेला दे म्हणजे ते तुझ्या गावात तो खाऊन तृप्त होतील;
13मग तू आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर असे म्हण : ‘पवित्र केलेल्या वस्तू मी आपल्या घरातून काढल्या आहेत आणि तू मला दिलेल्या सर्व आज्ञांना अनुसरून त्या मी लेवी, उपरा, अनाथ व विधवा ह्यांना दिल्या आहेत; मी तुझ्या कोणत्याही आज्ञेचे उल्लंघन केलेले नाही किंवा त्या मी विसरलोही नाही.
14मी सुतकी असताना ह्यांतले काही खाल्ले नाही, अथवा अशुद्ध असताना ह्यांतले काही काढून टाकले नाही, अथवा मृतांसाठी त्यांतले काही दिले नाही. मी आपला देव परमेश्वर ह्याचा शब्द मानला आहे; मी तुझ्या सर्व आज्ञांप्रमाणे केले आहे.
15तू आपल्या पवित्र निवासातून, स्वर्गातून अवलोकन कर, आपल्या इस्राएल प्रजेला आशीर्वाद दे आणि तू आमच्या पूर्वजांशी शपथ वाहिल्याप्रमाणे जो देश तू आम्हांला दिला आहे त्या ह्या दुधामधाचे प्रवाह वाहणार्या देशाला बरकत दे.’
परमेश्वराची पवित्र प्रजा
16हे विधी व नियम तू पाळावेस अशी आज्ञा आज तुझा देव परमेश्वर तुला करीत आहे म्हणून ते तू जिवेभावे व काळजीपूर्वक पाळ.
17परमेश्वर हा आपला देव आहे असे मान्य करून तू आज वचन दिले आहेस की, मी तुझ्या मार्गांनी चालेन, तुझे विधी, आज्ञा व नियम पाळीन आणि तुझा शब्द मानीन.
18आणि परमेश्वरानेही आज मान्य केले आहे की, ‘तुला सांगितल्याप्रमाणे तू माझी खास प्रजा झाला आहेस; तू माझ्या सर्व आज्ञा पाळ,
19म्हणजे मी निर्माण केलेल्या सर्व राष्ट्रांपेक्षा प्रशंसा, नावलौकिक आणि सन्मान ह्या बाबतीत तुला श्रेष्ठ करीन आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे तू परमेश्वर आपला देव ह्याची पवित्र प्रजा होशील.”
सध्या निवडलेले:
अनुवाद 26: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.