तुझा देव परमेश्वर तुला जो देश देत आहे त्यात तू जाशील तेव्हा त्यातल्या राष्ट्रांप्रमाणे अमंगल कृत्ये करायला शिकू नकोस. आपल्या मुलाचा किंवा मुलीचा अग्नीत होम करणारा, चेटूक करणारा, शकुनमुहूर्त पाहणारा, मंत्रतंत्र करणारा, जादूगार, वशीकरण करणारा, पंचाक्षरी, छांछू करणारा, अथवा मृतात्म्याला विचारणारा असा तुमच्यापैकी कोणी नसावा. कारण जो कोणी असली कृत्ये करतो त्याचा परमेश्वराला वीट आहे आणि त्यांच्या असल्या अमंगल कृत्यांमुळेच तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्यापुढून घालवून देत आहे. तू आपला देव परमेश्वर ह्याच्याशी सात्त्विकतेने वाग. ज्या राष्ट्रांचा तू ताबा घेणार आहेस ती शकुनमुहूर्त पाहणार्यांचे आणि चेटूक करणार्यांचे ऐकणारी आहेत; पण तुझा देव परमेश्वर तुला तसे करू देत नाही. तुझा देव परमेश्वर तुझ्यामधून म्हणजे तुझ्या भाऊबंदांमधून माझ्यासारखा एक संदेष्टा तुझ्याकरता उभा करील, त्याचे तुम्ही ऐका; होरेब डोंगराजवळ मंडळी जमली होती त्या दिवशी आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे तू विनंती केली होतीस त्याप्रमाणे होईल; तू म्हणालास, ‘माझा देव परमेश्वर ह्याची वाणी पुन्हा माझ्या कानी न पडो, मोठा अग्नी पुन्हा माझ्या दृष्टीस न पडो, पडला तर मी मरेन.’ तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, ‘हे लोक म्हणतात ते ठीक आहे. मी त्यांच्यासाठी त्यांच्या भाऊबंदांतून तुझ्यासारखा एक संदेष्टा उभा करीन; त्याच्या मुखात मी आपली वचने घालीन आणि त्यांना ज्या आज्ञा मी देईन त्या सगळ्या तो त्यांना निवेदन करील. तो माझ्या नावाने बोलेल ती वचने जो कोणी ऐकणार नाही त्याला मी जाब विचारीन. पण जो संदेष्टा उन्मत्त होऊन जे बोलायची आज्ञा मी त्याला दिली नाही ते वचन माझ्या नावाने बोलेल अथवा जो अन्य देवांच्या नावाने बोलेल तो संदेष्टा प्राणास मुकेल.’ ‘अमुक वचन परमेश्वर बोलला नाही हे आम्ही कशावरून ओळखावे’ असा विचार तुझ्या मनात आला, तर कोणी संदेष्टा परमेश्वराच्या नावाने काही बोलला आणि त्याप्रमाणे घडले नाही किंवा प्रत्ययास आले नाही तर परमेश्वराचे ते बोलणे नव्हते असे समजावे; तो संदेष्टा उन्मत्त होऊन बोलला आहे; तू त्याची भीती बाळगू नकोस.
अनुवाद 18 वाचा
ऐका अनुवाद 18
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: अनुवाद 18:9-22
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ