YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 1:1-18

अनुवाद 1:1-18 MARVBSI

यार्देनेच्या पूर्वेस रानातील अराबात सूफासमोर पारान, तोफेल, लाबान, हसेरोथ व दी-जाहाब ह्यांच्या दरम्यान जी वचने मोशे सर्व इस्राएलांशी बोलला ती ही. होरेबापासून सेईर डोंगराच्या मार्गे कादेश-बर्ण्या अकरा दिवसांच्या वाटेवर आहे. चाळिसाव्या वर्षाच्या अकराव्या महिन्याच्या प्रतिपदेस जे काही इस्राएल लोकांना सांगावे म्हणून परमेश्वराने मोशेला आज्ञा केली होती, त्याप्रमाणे त्याने हे सर्व त्यांना सांगितले. मोशेने हेशबोनात राहणारा अमोर्‍यांचा राजा सीहोन ह्याला, आणि एद्रई येथे अष्ठरोथ येथील बाशानाचा राजा ओग ह्याला ठार मारल्यावर, यार्देनेच्या पूर्वेस मवाब देशात तो ह्या नियमशास्त्राचे विवरण करू लागला; तो म्हणाला, “परमेश्वर आपला देव ह्याने होरेबात आपणांला सांगितले की, ‘तुम्ही ह्या डोंगरवटीत राहिलात त्याला बरेच दिवस झाले; तर आता येथून कूच करा, आणि अमोर्‍यांच्या पहाडी प्रदेशात आणि त्यांच्या आसपासच्या सर्व प्रदेशात चला, म्हणजे अराबात, डोंगरवटीत, तळवटीत, नेगेबात व समुद्रतीरी असलेल्या कनान्यांच्या देशात व लबानोनापर्यंत आणि फरात महानदीपर्यंत जा. पाहा, हा देश मी तुमच्यापुढे ठेवला आहे, म्हणून परमेश्वराने तुमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना व त्यांच्यामागून त्यांच्या वंशजांना जो देश शपथपूर्वक देऊ केला आहे, त्यात जाऊन तो वतन करून घ्या.’ त्या वेळी मी तुम्हांला सांगितले होते की, ‘मला एकट्याला तुमचा भार सहन करवत नाही; तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला बहुगुणित केले असून आज तुमची संख्या आकाशातील तार्‍यांइतकी आहे. तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर, तुम्ही आता आहात त्यापेक्षा सहस्रपट तुम्हांला वाढवो, आणि आपल्या वचनाप्रमाणे तो तुम्हांला आशीर्वाद देवो. तुमची दगदग, तुमचा भार व तुमची भांडणे मी एकटा कोठवर सोसू? म्हणून तुम्ही आपापल्या वंशातून बुद्धिमान, समजूतदार व अनुभवी पुरुष निवडा म्हणजे मी त्यांना तुमचे प्रमुख नेमतो.’ तेव्हा तुम्ही मला उत्तर दिले की, ‘तू सांगतोस तसे करणे ठीक आहे.’ म्हणून तुमच्या वंशांपैकी बुद्धिमान व अनुभवी अशा मुख्य पुरुषांना मी तुमचे प्रमुख नेमले, म्हणजे तुमच्या वंशावंशांप्रमाणे हजारा-हजारांवर, शंभरा-शंभरांवर, पन्नासा-पन्नासांवर व दहा-दहांवर नायक व अंमलदार नेमून दिले. त्या वेळी मी तुमच्या न्यायाधीशांना आज्ञा केली की, ‘तुम्ही आपापल्या भाऊबंदांचे वाद ऐका; एखादा माणूस व त्याचा भाऊबंद व त्याच्याजवळचा उपरा ह्यांच्यामध्ये नीतीने न्याय करा. न्याय करताना पक्षपात करू नका, लहानमोठ्यांचे सारखेच ऐकून घ्या; कोणाचे तोंड पाहून भिऊ नका; कारण न्याय करणे देवाचे काम आहे; एखादे प्रकरण तुम्हांला विशेष अवघड वाटले, तर ते माझ्याकडे घेऊन या, म्हणजे मी ते ऐकेन.’ त्या वेळी तुमच्या सर्व कर्तव्यकर्मांविषयी मी तुम्हांला आज्ञा केली होती.