YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 1

1
होरेब येथे मोशे इस्राएल लोकांना परमेश्वराची वचने पुन्हा सांगतो
1यार्देनेच्या पूर्वेस रानातील अराबात सूफासमोर पारान, तोफेल, लाबान, हसेरोथ व दी-जाहाब ह्यांच्या दरम्यान जी वचने मोशे सर्व इस्राएलांशी बोलला ती ही.
2होरेबापासून सेईर डोंगराच्या मार्गे कादेश-बर्ण्या अकरा दिवसांच्या वाटेवर आहे.
3चाळिसाव्या वर्षाच्या अकराव्या महिन्याच्या प्रतिपदेस जे काही इस्राएल लोकांना सांगावे म्हणून परमेश्वराने मोशेला आज्ञा केली होती, त्याप्रमाणे त्याने हे सर्व त्यांना सांगितले.
4मोशेने हेशबोनात राहणारा अमोर्‍यांचा राजा सीहोन ह्याला, आणि एद्रई येथे अष्ठरोथ येथील बाशानाचा राजा ओग ह्याला ठार मारल्यावर, 5यार्देनेच्या पूर्वेस मवाब देशात तो ह्या नियमशास्त्राचे विवरण करू लागला; तो म्हणाला, 6“परमेश्वर आपला देव ह्याने होरेबात आपणांला सांगितले की, ‘तुम्ही ह्या डोंगरवटीत राहिलात त्याला बरेच दिवस झाले;
7तर आता येथून कूच करा, आणि अमोर्‍यांच्या पहाडी प्रदेशात आणि त्यांच्या आसपासच्या सर्व प्रदेशात चला, म्हणजे अराबात, डोंगरवटीत, तळवटीत, नेगेबात व समुद्रतीरी असलेल्या कनान्यांच्या देशात व लबानोनापर्यंत आणि फरात महानदीपर्यंत जा.
8पाहा, हा देश मी तुमच्यापुढे ठेवला आहे, म्हणून परमेश्वराने तुमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना व त्यांच्यामागून त्यांच्या वंशजांना जो देश शपथपूर्वक देऊ केला आहे, त्यात जाऊन तो वतन करून घ्या.’
नायकांची नेमणूक
(निर्ग. 18:13-27)
9त्या वेळी मी तुम्हांला सांगितले होते की, ‘मला एकट्याला तुमचा भार सहन करवत नाही;
10तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला बहुगुणित केले असून आज तुमची संख्या आकाशातील तार्‍यांइतकी आहे.
11तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर, तुम्ही आता आहात त्यापेक्षा सहस्रपट तुम्हांला वाढवो, आणि आपल्या वचनाप्रमाणे तो तुम्हांला आशीर्वाद देवो.
12तुमची दगदग, तुमचा भार व तुमची भांडणे मी एकटा कोठवर सोसू?
13म्हणून तुम्ही आपापल्या वंशातून बुद्धिमान, समजूतदार व अनुभवी पुरुष निवडा म्हणजे मी त्यांना तुमचे प्रमुख नेमतो.’
14तेव्हा तुम्ही मला उत्तर दिले की, ‘तू सांगतोस तसे करणे ठीक आहे.’
15म्हणून तुमच्या वंशांपैकी बुद्धिमान व अनुभवी अशा मुख्य पुरुषांना मी तुमचे प्रमुख नेमले, म्हणजे तुमच्या वंशावंशांप्रमाणे हजारा-हजारांवर, शंभरा-शंभरांवर, पन्नासा-पन्नासांवर व दहा-दहांवर नायक व अंमलदार नेमून दिले.
16त्या वेळी मी तुमच्या न्यायाधीशांना आज्ञा केली की, ‘तुम्ही आपापल्या भाऊबंदांचे वाद ऐका; एखादा माणूस व त्याचा भाऊबंद व त्याच्याजवळचा उपरा ह्यांच्यामध्ये नीतीने न्याय करा.
17न्याय करताना पक्षपात करू नका, लहानमोठ्यांचे सारखेच ऐकून घ्या; कोणाचे तोंड पाहून भिऊ नका; कारण न्याय करणे देवाचे काम आहे; एखादे प्रकरण तुम्हांला विशेष अवघड वाटले, तर ते माझ्याकडे घेऊन या, म्हणजे मी ते ऐकेन.’
18त्या वेळी तुमच्या सर्व कर्तव्यकर्मांविषयी मी तुम्हांला आज्ञा केली होती.
कादेश-बर्ण्यास पाठवलेले हेर
(गण. 13:1-33)
19मग आपण होरेबाहून कूच करून आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेनुसार जे मोठे व भयानक रान अमोर्‍यांच्या पहाडी प्रदेशाकडे जाताना तुम्हांला लागले, ते सर्व ओलांडून कादेश-बर्ण्यापर्यंत पोहचलो.
20तेव्हा मी तुम्हांला सांगितले की, ‘अमोर्‍यांचा जो पहाडी प्रदेश आपला देव परमेश्वर आपणांस देणार आहे तेथपर्यंत तुम्ही आला आहात.
21पाहा, तुझा देव परमेश्वर ह्याने तो देश तुझ्यापुढे ठेवला आहे; तुझ्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे त्यावर चढाई करून तो हस्तगत कर; भिऊ नकोस व कचरू नकोस.’
22तेव्हा तुम्ही सगळे माझ्याकडे येऊन म्हणालात, ‘आम्ही माणसे पुढे पाठवतो म्हणजे ती त्या देशाची माहिती मिळवून कोणत्या मार्गाने आम्हांला जावे लागेल व कोणकोणती नगरे लागतील ह्याची आम्हांला खबर आणतील.’
23ही गोष्ट मला पसंत पडली म्हणून प्रत्येक वंशामागे एक अशी तुमच्यातली बारा माणसे मी निवडून काढली;
24ती निघाली व पहाडी प्रदेशात गेली आणि अष्कोल नाल्यापर्यंत जाऊन त्यांनी देश हेरला;
25त्यांनी त्या देशाची काही फळे बरोबर घेतली आणि खाली आमच्याकडे आणली, आणि त्यांनी अशी खबर आणली की, ‘आपला देव परमेश्वर जो देश आपल्याला देणार आहे तो उत्तम आहे.’
26तथापि तुम्ही तेथे जाईनात, उलट तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेविरुद्ध बंड केले;
27तुम्ही आपल्या डेर्‍यात कुरकुर करीत म्हणालात की, ‘परमेश्वर आमचा द्वेष करीत आहे, आणि म्हणूनच आम्हांला अमोर्‍यांच्या हाती देऊन आमचा सत्यानाश करावा ह्या हेतूने त्याने आम्हांला मिसर देशातून काढून आणले आहे.
28आम्ही कोठे निघालो आहोत? तेथील लोक आमच्यापेक्षा धिप्पाड व उंच आहेत; तेथील नगरे मोठी असून त्यांचे तट गगनापर्यंत पोहचले आहेत आणि तेथे अनाकाचे वंशज आम्ही पाहिले, असे आमच्या भाऊबंदांनी आम्हांला सांगितले तेव्हा आमच्या हृदयाचे पाणीपाणी झाले.’
29तेव्हा मी तुम्हांला म्हणालो, ‘घाबरू नका, त्यांना भिऊ नका.
30तुमचा देव परमेश्वर तुमचा अग्रगामी आहे, त्याने मिसर देशात तुमच्यादेखत जे जे केले, ते ते सर्व करून तो तुमच्यासाठी लढेल;
31आणि तुम्ही रानातही पाहिले की, येथवर येऊन पोहचेपर्यंत जो सारा मार्ग तुम्ही आक्रमिला त्यात तुमचा देव परमेश्वर ह्याने, मनुष्य जसा आपल्या मुलाला वाहून नेतो तसे तुम्हांला नेले.’
32एवढे करूनही आपला देव परमेश्वर ह्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला नाही.
33तुमच्यासाठी वाटेत तळ देण्याचे ठिकाण शोधण्यास आणि रात्री अग्नीत व दिवसा मेघात प्रकट होऊन, ज्या वाटेने तुम्ही जायचे ती वाट तुम्हांला दाखवण्यास तो तुमच्यापुढे चालला.
इस्राएल लोकांना परमेश्वराने केलेली शिक्षा
(गण. 14:20-35)
34तेव्हा तुमचे बोलणे ऐकून परमेश्वराचा कोप भडकला आणि तो शपथ वाहून म्हणाला,
35‘जो उत्तम देश तुमच्या पूर्वजांना देण्याचे मी शपथपूर्वक वचन दिले होते, तो देश ह्या दुष्ट पिढीतील माणसांपैकी एकाच्याही दृष्टीस पडणार नाही;
36यफुन्नेचा मुलगा कालेब हा मात्र तो पाहील; ज्या भूमीला त्याचे पाय लागले ती मी त्याला व त्याच्या वंशजांना देईन, कारण तो परमेश्वराला पूर्णपणे अनुसरला आहे.’
37तुमच्यामुळे माझ्यावरही परमेश्वर रागावून म्हणाला की, ‘तूही त्या देशात प्रवेश करणार नाहीस;
38पण तुझ्या सेवेस हजर राहणारा नूनाचा मुलगा यहोशवा ह्याचा प्रवेश होईल. तू त्याला धीर दे; कारण तो देश इस्राएलास वतन म्हणून तो मिळवून देईल.
39आणि ही लुटली जातील असे ज्या तुमच्या मुलाबाळांविषयी तुम्ही म्हणालात ती, म्हणजे जी मुले आज बरेवाईट जाणत नाहीत ती त्या देशात जातील, मी तो त्यांना देईन आणि ती तो वतन करून घेतील.
40पण तुम्ही परत जा आणि तांबड्या समुद्राच्या वाटेने रानातून कूच करा.’
हर्मा येथे इस्राएल लोकांचा पराभव
(गण. 14:39-45)
41तेव्हा तुम्ही मला असे उत्तर दिले की, ‘आम्ही परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे, तरी आमचा देव परमेश्वर ह्याने आम्हांला आज्ञा केल्याप्रमाणे आम्ही वर चढून जाऊ व युद्ध करू;’ आणि तुमच्यापैकी प्रत्येकाने आपली युद्धाची शस्त्रे धारण केली आणि तुम्ही डोंगराळ प्रदेशात चढून जाण्यास तयार झालात.
42तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, ‘त्यांना सांग, तुम्ही जाऊ नका व लढाई करू नका, कारण मी तुमच्यामध्ये नाही; गेलात तर शत्रू तुमचा मोड करील.’
43त्याप्रमाणे मी तुम्हांला सांगितले, पण तुम्ही ऐकले नाही; उलट तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेविरुद्ध बंड केले आणि धिटाई करून त्या डोंगराळ प्रदेशात चढून गेलात.
44तेव्हा त्या डोंगराळ प्रदेशात राहणार्‍या अमोर्‍यांनी बाहेर पडून तुमच्याशी सामना करून मधमाश्यांप्रमाणे तुमचा पाठलाग केला, आणि सेईर देशातील हर्मापर्यंत तुम्हांला पिटाळून लावले.
45तेव्हा तुम्ही माघारी येऊन परमेश्वरासमोर रडू लागलात; पण परमेश्वराने तुमचा शब्द ऐकला नाही व तुमच्याकडे लक्ष दिले नाही.
46तेव्हा तुम्ही कादेशात बरेच दिवस वस्तीस राहिलात, ते तुम्हांला ठाऊकच आहे.

सध्या निवडलेले:

अनुवाद 1: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन