YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 7:9-14

दानीएल 7:9-14 MARVBSI

मी पाहत असता आसने मांडण्यात आली आणि एक पुराणपुरुष आसनारुढ झाला; त्याचा पेहराव बर्फासारखा पांढरा होता, त्याच्या डोक्याचे केस स्वच्छ लोकरीसारखे होते; त्याचे आसन प्रत्यक्ष अग्निज्वालामय होते; व त्या आसनाची चक्रे धगधगीत अग्निरूप होती. त्याच्यासमोरून अग्निप्रवाह वाहत होता; हजारो लोक त्याची सेवा करीत होते; लाखो लोक त्याच्यासमोर उभे होते; न्यायसभा भरली; वह्या उघडल्या गेल्या. त्या वेळी त्या शिंगांतून निघालेला मोठा शब्द ऐकून मी पाहत असता त्या श्वापदाचा वध करण्यात आला; त्याचे शरीर छिन्नभिन्न करण्यात आले; व ते जळावे म्हणून अग्नीत टाकण्यात आले; एवढे मी पाहिले. इतर श्वापदांविषयी म्हणाल तर त्यांचा अधिकार हरण करण्यात आला; तरी काही मुदतीपर्यंत काही काळपावेतो त्यांचा प्राण वाचवण्यात आला. तेव्हा मी रात्रीच्या दृष्टान्तात पाहिले तर आकाशातील मेघांवर आरूढ होऊन, मानवपुत्रासारखा कोणी आला; तो त्या पुराणपुरुषाकडे आला व त्याला त्यांनी त्याच्याजवळ नेले. सर्व लोक, सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक, ह्यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्याला प्रभुत्व, वैभव व राज्य ही दिली; त्याचे प्रभुत्व अक्षय व अढळ आहे; त्याचे राज्य अविनाशी आहे.