YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 5:5-12

दानीएल 5:5-12 MARVBSI

त्याच घटकेस मानवी हाताची बोटे प्रकट झाली व त्यांनी दीपवृक्षासमोर राजवाड्याच्या भिंतींच्या गिलाव्यावर काही लिहिले आणि हाताची बोटे लिहीत होती ती राज्याच्या दृष्टीस पडली. तेव्हा राजाची मुद्रा पालटली व तो चिंताक्रांत झाला; त्याच्या कंबरेचे सांधे ढिले पडले, आणि त्याचे गुडघे लटपटू लागले. राजाने मोठ्याने ओरडून म्हटले की, “मांत्रिक, खास्दी व दैवज्ञ ह्यांना घेऊन या.” राजा त्या बाबेलच्या ज्ञान्यांस म्हणाला, “जो कोणी हा लेख वाचील व ह्याचा अर्थ मला सांगेल त्याला जांभळ्या रंगाचा पोशाख मिळेल, त्याच्या गळ्यात सोन्याचा गोफ घालण्यात येईल व तो राज्यातील तिघा अधिपतींतला एक होईल.” मग राजाचे सर्व ज्ञानी पुरुष वाड्यात आले; पण त्यांना तो लेख वाचता येईना व त्याचा अर्थ राजाला सांगता येईना. तेव्हा बेलशस्सर राजा फार चिंताक्रांत झाला, त्याची मुद्रा पालटली आणि त्याचे सरदार घाबरले. राजा व त्याचे सरदार ह्यांचे शब्द ऐकून राणी भोजनगृहात आली. ती म्हणाली, “महाराज, चिरायू असा; आपल्या मनाची तळमळ होऊ देऊ नका; आपण आपली मुद्रा पालटू देऊ नका. पवित्र देवांचा आत्मा ज्यात आहे असा एक पुरुष आपल्या राज्यात आहे; आपल्या बापाच्या कारकिर्दीत प्रकाश, विवेक व देवांच्या ज्ञानासारखे ज्ञान ही त्याच्या ठायी दिसून आली; महाराज, आपला बाप नबुखद्नेस्सर राजा ह्यांनी त्याला ज्योतिषी, मांत्रिक, खास्दी व दैवज्ञ ह्यांचा अध्यक्ष नेमले होते; कारण उत्तम आत्मा, ज्ञान, विवेक, स्वप्नांचा अर्थ सांगणे, कूट प्रश्‍न उलगडणे, कोडी उकलणे, ह्यासंबंधाने ज्याला राजाने बेल्टशस्सर असे नाव दिले होते तो दानीएल प्रवीण होता असे दिसून आले; तर आता दानिएलास बोलावून आणा म्हणजे तो अर्थ सांगेल.”