YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 5:17-23

दानीएल 5:17-23 MARVBSI

तेव्हा दानिएलाने राजास उत्तर दिले की, “तुझ्या देणग्या तुझ्याजवळच राहू दे, तुझी इनामे दुसर्‍या कोणास दे, तथापि मी हा लेख राजाला वाचून दाखवतो व त्याचा अर्थ करून तुला सांगतो. हे राजा, परात्पर देवाने तुझा बाप नबुखद्नेस्सर ह्याला राज्य, महत्त्व, वैभव व महिमा ही दिली. त्याने त्याला मोठेपणा दिला म्हणून सर्व लोक, सर्व राष्ट्रांचे व सर्व भाषा बोलणारे लोक त्याच्यापुढे थरथर कापत व त्याला भीत; वाटेल त्याला तो ठार मारी व वाटेल त्याला जिवंत राखी; वाटेल त्याला तो थोर करी व वाटेल त्याला तो नीच करी. पुढे त्याच्या हृदयात ताठा शिरला, व त्याचा आत्मा कठोर होऊन उन्मत्त झाला तेव्हा त्याला त्याच्या राजपदावरून काढण्यात आले व त्याचे वैभव हिरावून घेण्यात आले. त्याला मनुष्यांतून घालवून देण्यात आले; त्याचे हृदय पशूंसारखे झाले; तो रानगाढवांमध्ये वस्ती करू लागला; तो बैलाप्रमाणे गवत खाई व त्याचे शरीर आकाशातील दहिवराने भिजत असे. मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो त्यावर पाहिजे त्याला स्थापतो, असे ज्ञान त्याला होईपर्यंत तो असा राहिला. हे बेलशस्सरा, तू त्याचा पुत्र आहेस. हे सर्व तुला ठाऊक असून तू आपले मन नम्र केले नाहीस; तर स्वर्गीच्या प्रभूबरोबर तू उद्दामपणा केलास; त्याच्या मंदिरातील पात्रे तुझ्यापुढे आणली आहेत; तू, तुझे सरदार, तुझ्या पत्नी व उपपत्नी ही त्यांतून द्राक्षारस प्याली आहेत आणि रुपे, सोने, पितळ, लोखंड, काष्ठ व पाषाण ह्यांची घडलेली दैवते, ज्यांना दिसत नाही, ऐकता येत नाही व समजत नाही, त्यांचे तू स्तवन केलेस; पण ज्याच्या हाती तुझा प्राण आहे व ज्याच्या स्वाधीन तुझे सर्व व्यवहार आहेत त्या देवाला मान दिला नाहीस