YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 5:13-22

दानीएल 5:13-22 MARVBSI

तेव्हा दानिएलास राजापुढे आणले. राजा त्याला म्हणाला, “माझा बाप, जो राजा, त्याने यहूदातून पकडून आणलेल्या लोकांपैकी दानीएल तो तूच काय? मी तुझ्याविषयी ऐकले आहे की देवांचा आत्मा तुझ्या ठायी आहे आणि प्रकाश, विवेक व उत्तम ज्ञान ही तुझ्या ठायी दिसून आली आहेत. आता हा लेख वाचून त्याचा अर्थ मला सांगावा म्हणून हे ज्ञानी व मांत्रिक लोक माझ्यापुढे आणले, पण त्याचा अर्थ त्यांना सांगता येईना. मी तुझ्याविषयी ऐकले आहे की, तुला स्वप्नांचा अर्थ सांगता येतो व कोडी उकलता येतात; आता तुला हा लेख वाचता येऊन त्याचा अर्थ मला सांगता आला तर तुला जांभळ्या रंगाचा पोशाख मिळेल, तुझ्या गळ्यात सोन्याचा गोफ घालण्यात येईल आणि तू राज्यातील तिघा अधिपतींतला एक होशील.” तेव्हा दानिएलाने राजास उत्तर दिले की, “तुझ्या देणग्या तुझ्याजवळच राहू दे, तुझी इनामे दुसर्‍या कोणास दे, तथापि मी हा लेख राजाला वाचून दाखवतो व त्याचा अर्थ करून तुला सांगतो. हे राजा, परात्पर देवाने तुझा बाप नबुखद्नेस्सर ह्याला राज्य, महत्त्व, वैभव व महिमा ही दिली. त्याने त्याला मोठेपणा दिला म्हणून सर्व लोक, सर्व राष्ट्रांचे व सर्व भाषा बोलणारे लोक त्याच्यापुढे थरथर कापत व त्याला भीत; वाटेल त्याला तो ठार मारी व वाटेल त्याला जिवंत राखी; वाटेल त्याला तो थोर करी व वाटेल त्याला तो नीच करी. पुढे त्याच्या हृदयात ताठा शिरला, व त्याचा आत्मा कठोर होऊन उन्मत्त झाला तेव्हा त्याला त्याच्या राजपदावरून काढण्यात आले व त्याचे वैभव हिरावून घेण्यात आले. त्याला मनुष्यांतून घालवून देण्यात आले; त्याचे हृदय पशूंसारखे झाले; तो रानगाढवांमध्ये वस्ती करू लागला; तो बैलाप्रमाणे गवत खाई व त्याचे शरीर आकाशातील दहिवराने भिजत असे. मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो त्यावर पाहिजे त्याला स्थापतो, असे ज्ञान त्याला होईपर्यंत तो असा राहिला. हे बेलशस्सरा, तू त्याचा पुत्र आहेस. हे सर्व तुला ठाऊक असून तू आपले मन नम्र केले नाहीस