बेलशस्सर राजाने आपल्या एक हजार सरदारांना मोठी मेजवानी केली; त्या हजारांसमक्ष तो द्राक्षारस प्याला. द्राक्षारसाचे सेवन करीत असता बेलशस्सराने हुकूम केला की, ‘माझा बाप नबुखद्नेस्सर ह्याने यरुशलेमेतील मंदिरातून जी सोन्यारुप्याची पात्रे आणली आहेत ती घेऊन या, म्हणजे मी, माझे सरदार, माझ्या पत्नी व उपपत्नी ह्यांना त्यांतून द्राक्षारस पिता येईल.’ तेव्हा यरुशलेमेतील देवाच्या मंदिराच्या पवित्रस्थानातून आणलेली सोन्याची पात्रे ते घेऊन आले; राजा, त्याचे सरदार, त्याच्या पत्नी व उपपत्नी ही त्यांतून द्राक्षारस प्याली. त्यांनी द्राक्षारस पिऊन सोने. रुपे, पितळ, लोखंड, काष्ठ व पाषाण ह्यांपासून घडलेल्या दैवतांचे स्तवन केले. त्याच घटकेस मानवी हाताची बोटे प्रकट झाली व त्यांनी दीपवृक्षासमोर राजवाड्याच्या भिंतींच्या गिलाव्यावर काही लिहिले आणि हाताची बोटे लिहीत होती ती राज्याच्या दृष्टीस पडली. तेव्हा राजाची मुद्रा पालटली व तो चिंताक्रांत झाला; त्याच्या कंबरेचे सांधे ढिले पडले, आणि त्याचे गुडघे लटपटू लागले. राजाने मोठ्याने ओरडून म्हटले की, “मांत्रिक, खास्दी व दैवज्ञ ह्यांना घेऊन या.” राजा त्या बाबेलच्या ज्ञान्यांस म्हणाला, “जो कोणी हा लेख वाचील व ह्याचा अर्थ मला सांगेल त्याला जांभळ्या रंगाचा पोशाख मिळेल, त्याच्या गळ्यात सोन्याचा गोफ घालण्यात येईल व तो राज्यातील तिघा अधिपतींतला एक होईल.” मग राजाचे सर्व ज्ञानी पुरुष वाड्यात आले; पण त्यांना तो लेख वाचता येईना व त्याचा अर्थ राजाला सांगता येईना. तेव्हा बेलशस्सर राजा फार चिंताक्रांत झाला, त्याची मुद्रा पालटली आणि त्याचे सरदार घाबरले.
दानीएल 5 वाचा
ऐका दानीएल 5
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: दानीएल 5:1-9
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ