मग बेल्टशस्सर हे नाव दिलेला दानीएल क्षणभर बुचकळ्यात पडला व विचारांनी त्याचे मन व्यग्र झाले. तेव्हा राजा त्याला म्हणाला, “बेल्टशस्सरा, ह्या स्वप्नासंबंधाने व त्याच्या अर्थासंबंधाने तू घाबरू नकोस.” तेव्हा बेल्टशस्सराने म्हटले, “माझे स्वामी, हे स्वप्न आपल्या द्वेष्ट्यांना व त्याचा अर्थ आपल्या वैर्यांना लागू पडो! आपण वृक्ष पाहिलास तो वाढून मजबूत झाला, त्याची उंची गगनास पोहचली, तो सगळ्या पृथ्वीला दिसू लागला; त्याची पाने सुंदर होती, त्यावर फळे विपुल असून सर्वांना खाण्यास पुरेशी होती, त्याच्याखाली वनपशू राहत होते व त्याच्या शाखांत अंतराळातील पक्षी वस्ती करत होते; महाराज, तो वृक्ष आपणच आहात; आपण वाढून बलवान झाला आहात; आपली थोरवी वाढून गगनापर्यंत पोहचली आहे. आणि महाराजांनी असे पाहिले की, एक जागल्या, पवित्र पुरुष, आकाशातून उतरून म्हणाला, हा वृक्ष तोडून ह्याचा नाश करा; तथापि ह्याचे बुंध जमिनीत राहू द्या; ह्याला लोखंड व पितळ ह्यांच्या पट्ट्याने बांधून रानातल्या कोवळ्या गवतात राहू द्या; ह्याला आकाशातल्या दहिवराने भिजू द्या; ह्याला वनपशूंबरोबर वाटा मिळो, ह्याच्यावरून सात काळ जावोत तोवर असे होवो. महाराज, ह्याचा अर्थ असा आहे आणि माझे स्वामीराजे, ह्याच्याविषयी परात्पर देवाचा ठराव हा आहे : आपणाला मनुष्यांतून घालवून देतील; आपली वस्ती वनपशूंत होईल; आपणाला बैलाप्रमाणे गवत खावे लागेल; आपण आकाशातील दहिवराने भिजाल; मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्याला देतो हे ज्ञान आपणाला होईपर्यंत आपणावरून सात काळ जातील. त्यांनी त्या वृक्षाचे बुंध राखून ठेवायला सांगितले; ह्याचा अर्थ हा की सत्ता ही स्वर्गातील देवाची आहे हे ज्ञान आपणाला झाले म्हणजे आपले राज्य निश्चयाने आपणास मिळेल.’ म्हणून महाराज, माझी मसलत आपण मान्य करावी; आपण पाप सोडून न्यायनीतीचे आचरण करावे; अधर्म सोडून गरिबांवर दया करावी; अशाने कदाचित आपले स्वास्थ्य अधिक काळ राहील.” हे सगळे नबुखद्नेस्सर राजा ह्याच्यावर गुजरले. बारा महिने लोटल्यावर तो एकदा बाबेलच्या राजवाड्याच्या गच्चीवर फिरत होता. त्या वेळी राजा म्हणाला, “हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधले आहे ना!” हे शब्द राजाच्या मुखातून निघतात न निघतात तोच आकाशवाणी झाली की, “हे राजा, नबुखद्नेस्सरा, हे तुला विदित होवो की तुझ्या हातची राजसत्ता गेली आहे. तुला मनुष्यांतून घालवून देतील; तुझी वस्ती वनपशूंत होईल; तुला बैलाप्रमाणे गवत खावे लागेल; आणि मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्याला देतो हे ज्ञान तुला होईपर्यंत तुझ्यावरून सात काळ जातील.” त्याच घटकेस हे नबुखद्नेस्सराच्या प्रत्ययास आले; त्याला मनुष्यांतून घालवून दिले व तो बैलाप्रमाणे गवत खाऊ लागला; त्याचे शरीर आकाशातल्या दहिवराने भिजू लागले; येथवर की त्याचे केस गरुडाच्या पिसांप्रमाणे वाढले आणि त्याची नखे पक्ष्यांच्या नखांसारखी झाली.
दानीएल 4 वाचा
ऐका दानीएल 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: दानीएल 4:19-33
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ