YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 4:10-18

दानीएल 4:10-18 MARVBSI

मी आपल्या पलंगावर पडलो असता माझ्या मनात जे दृष्टान्त घोळत होते ते हे : मी पाहिले, तेव्हा पृथ्वीच्या मध्यभागी एक वृक्ष होता, त्याची उंची फार मोठी होती. तो वृक्ष वाढून मजबूत झाला, त्याची उंची गगनास पोहचली व तो सगळ्या पृथ्वीच्या दिगंतापर्यंत दिसू लागला. त्याला सुंदर पाने होती, त्यावर फळे विपुल असून सर्वांना खायला पुरेशी होती. वनपशू त्याच्या आश्रयाने राहत, अंतराळातील पक्षी त्याच्या शाखांमध्ये वस्ती करीत व त्या वृक्षावर सर्व मनुष्यांचे पोषण होत असे. मी पलंगावर पडलो असता माझ्या मनात दृष्टान्त घोळत होते, त्यांत मी पाहिले की एक जागल्या, पवित्र पुरुष, आकाशातून उतरला. तो मोठ्याने पुकारून म्हणाला, ‘हा वृक्ष तोडून टाका, ह्याच्या फांद्या छेदा, ह्याची पाने झाडून टाका व ह्याची फळे विखरा; ह्याच्याखाली राहत असलेले पशू निघून जावोत व पक्षी ह्याच्या शाखांतून उडून जावोत. तरीपण ह्याचे बुंध जमिनीत राहू द्या; ह्याला लोखंड व पितळ ह्यांच्या पट्ट्याने बांधून रानातल्या कोवळ्या गवतात राहू द्या; ह्याला आकाशातल्या दहिवराने भिजू द्या; भूमीवरील गवताचा वाटा ह्याला वनपशूंबरोबर मिळो; ह्याचे मानवहृदय जाऊन ह्याला पशुहृदय प्राप्त होवो व सात काळ त्याच्यावरून जावोत. हे शासन त्या जागल्यांच्या ठरावान्वये व पवित्र जनांच्या वचनानुसार झाले; ते अशासाठी की मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे, व तो ते पाहिजे त्याला देतो आणि त्यावर अगदी हलक्या प्रतीच्या मनुष्यांपैकी पाहिजे त्याला नेमतो, हे सर्व जीवधार्‍यांना समजावे.’ हे स्वप्न मी नबुखद्नेस्सर राजाने पाहिले आहे; तर आता हे बेल्टशस्सरा, ह्याच्या अर्थाचा उलगडा कर, कारण माझ्या राज्यातील सर्व ज्ञानी पुरुषांना ह्याचा अर्थ मला सांगता आला नाही; पण तुला सांगता येईल, कारण पवित्र देवांचा आत्मा तुझ्या ठायी आहे.”