YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 3:8-25

दानीएल 3:8-25 MARVBSI

ह्यावर कित्येक खास्द्यांनी राजाकडे जाऊन यहूद्यांवर दोषारोप केला. ते नबुखद्नेस्सर राजाला म्हणाले, “महाराज, चिरायू व्हा. महाराज, आपण हुकूम केला की, शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी ज्या ज्या मनुष्याच्या कानी पडेल त्याने सुवर्णमूर्तीपुढे साष्टांग दंडवत घालावेत; आणि जो कोणी साष्टांग दंडवत घालणार नाही त्याला धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकावे; पण आपण बाबेल परगण्यावर नेमलेले शद्रख, मेशख, अबेद्नगो ह्या नावांचे कोणी यहूदी आहेत त्यांनी, महाराज, आपली पर्वा केली नाही; ते आपल्या देवांची उपासना करीत नाहीत आणि आपण स्थापलेल्या सुवर्णमूर्तीची पूजा करीत नाहीत.” हे ऐकून नबुखद्नेस्सराने क्रोधाने संतप्त होऊन शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांना घेऊन येण्याची आज्ञा केली. तेव्हा लोकांनी त्यांना राजापुढे आणले. नबुखद्नेस्सर त्यांना म्हणाला, “अहो शद्रख, मेशख, अबेद्नगो, तुम्ही माझ्या देवांची उपासना करीत नाही व मी स्थापलेल्या सुवर्णमूर्तीची पूजा करीत नाही, असे तुम्ही मुद्दाम करता काय? आता शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी ऐकताच मी केलेल्या मूर्तीपुढे तुम्ही साष्टांग दंडवत घातले तर बरे; नाही घातले तर तुम्हांला धगधगीत अग्नीच्या भट्टीत ताबडतोब टाकण्यात येईल; माझ्या हातांतून तुम्हांला सोडवील असा कोणता देव आहे?” शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांनी राजाला उत्तर दिले की, “महाराज, ह्या बाबतीत आपणांला उत्तर देण्याचे आम्हांला प्रयोजन दिसत नाही. ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हांला धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवण्यास समर्थ आहे; महाराज, तो आम्हांला आपल्या हातातून सोडवील. ते कसेही असो, पण महाराज, हे आपण पक्के समजा की आम्ही आपल्या दैवतांची उपासना करणार नाही आणि आपण स्थापलेल्या सुवर्णमूर्तीला दंडवत घालणार नाही.” हे ऐकून नबुखद्नेस्सर संतापला; शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांच्यासंबंधाने त्याची मुद्रा पालटली आणि त्याने आज्ञा केली की, ‘भट्टी नेहमीपेक्षा सातपट तप्त करा.’ मग त्याने आपल्या सैन्यातील काही बलिष्ठ पुरुषांना आज्ञा केली की, ‘शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांच्या मुसक्या बांधून त्यांना त्या तप्त अग्नीच्या भट्टीत टाका.’ तेव्हा त्या पुरुषांना त्यांचे पायमोजे, अंगरखे, झगे वगैरे वस्त्रांसहित बांधून धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकले. राजाचा हुकूम अगदी सक्त असल्यामुळे ती भट्टी फारच तप्त केली होती; म्हणून ज्या पुरुषांनी शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांना तिच्यावर नेले ते ज्वालांनी भाजून मेले. शद्रख, मेशख व अबेद्नगो हे तीन पुरुष मुसक्या बांधलेले असे त्या धगधगीत अग्नीच्या भट्टीत पडले. नंतर नबुखद्नेस्सर राजा चकित होऊन पटकन उठला; तो आपल्या मंत्र्यांना म्हणाला, “आपण अग्नीत तिघा जणांना बांधून टाकले ना?” त्यांनी राजाला उत्तर केले, “होय महाराज, खरे आहे.” तो म्हणाला, पाहा! चार इसम अग्नीत मोकळे फिरत आहेत असे मला दिसते; त्यांना काहीएक इजा पोहचली नाही; चौथ्याचे स्वरूप तर एखाद्या देवपुत्रासारखे आहे.