YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 3:19-28

दानीएल 3:19-28 MARVBSI

हे ऐकून नबुखद्नेस्सर संतापला; शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांच्यासंबंधाने त्याची मुद्रा पालटली आणि त्याने आज्ञा केली की, ‘भट्टी नेहमीपेक्षा सातपट तप्त करा.’ मग त्याने आपल्या सैन्यातील काही बलिष्ठ पुरुषांना आज्ञा केली की, ‘शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांच्या मुसक्या बांधून त्यांना त्या तप्त अग्नीच्या भट्टीत टाका.’ तेव्हा त्या पुरुषांना त्यांचे पायमोजे, अंगरखे, झगे वगैरे वस्त्रांसहित बांधून धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकले. राजाचा हुकूम अगदी सक्त असल्यामुळे ती भट्टी फारच तप्त केली होती; म्हणून ज्या पुरुषांनी शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांना तिच्यावर नेले ते ज्वालांनी भाजून मेले. शद्रख, मेशख व अबेद्नगो हे तीन पुरुष मुसक्या बांधलेले असे त्या धगधगीत अग्नीच्या भट्टीत पडले. नंतर नबुखद्नेस्सर राजा चकित होऊन पटकन उठला; तो आपल्या मंत्र्यांना म्हणाला, “आपण अग्नीत तिघा जणांना बांधून टाकले ना?” त्यांनी राजाला उत्तर केले, “होय महाराज, खरे आहे.” तो म्हणाला, पाहा! चार इसम अग्नीत मोकळे फिरत आहेत असे मला दिसते; त्यांना काहीएक इजा पोहचली नाही; चौथ्याचे स्वरूप तर एखाद्या देवपुत्रासारखे आहे. मग नबुखद्नेस्सर त्या धगधगीत अग्नीच्या भट्टीच्या दारानजीक येऊन म्हणाला, “अहो शद्रख, मेशख व अबेद्नगो, परात्पर देवाचे सेवकहो, अग्नीतून बाहेर या.” तेव्हा शद्रख, मेशख व अबेद्नगो अग्नीतून बाहेर आले. आणि राजप्रतिनिधी, नायब अधिपती, सरदार व राजमंत्री जे तेथे जमले होते त्यांनी ह्या पुरुषांना पाहिले तेव्हा त्यांच्या शरीरावर अग्नीचा परिणाम झाला नव्हता, त्यांच्या डोक्याचा एक केसही होरपळला नव्हता, त्यांच्या पायमोजांना काही झाले नव्हते आणि अग्नीचा गंधही त्यांना लागला नव्हता. तेव्हा नबुखद्नेस्सर म्हणाला, शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांनी आपल्या देवावर भाव ठेवला, राजाचा शब्द मोडला, आपल्या देवाखेरीज अन्य देवाची सेवा व उपासना करायची नाही म्हणून त्यांनी आपले देह अर्पण केले; त्यांना त्यांच्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सोडवले आहे; त्याचा धन्यवाद असो!